17 December 2017

News Flash

६३७ ‘डासपालकां’वर खटला दाखल

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या होऊ नयेत यासाठी पालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली होती

प्रसाद रावकर, मुंबई | Updated: October 5, 2017 3:38 AM

डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट न करणाऱ्यांवर कारवाई; पालिकेकडून २२ लाख रुपयांची दंडवसुली

हिवताप, डेंग्यू आदी साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने मुंबईमध्ये डास निर्मूलनाची मोहीम हाती घेतली असून जानेवारी ते ऑगस्ट या काळात वारंवार लोकप्रबोधन करून, नोटीस देऊनही निर्मूलनात सहकार्य न करणाऱ्या सुमारे ६३७ मुंबईकरांवर पालिकेने न्यायालयात खटले दाखल केले आहेत. तर वारंवार लोकप्रबोधन केल्यानंतरही डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून येत असल्यामुळे झोपडपट्टीवासीयांवर ताकीद नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या होऊ नयेत यासाठी पालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली होती. उच्चभ्रू वस्ती, झोपडपट्टय़ा, चाळी, सोसायटय़ा, मॉल या ठिकाणी पाणी साचू न देता डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कीटकनाशक विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी पाहणी करून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करत होते.

जानेवारी ते ऑगस्ट या काळात राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यांना तब्बल २१ हजार ८८३ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. या ठिकाणी पुन्हा डासांच्या अळ्या दिसून येऊ नयेत, यासाठी संबंधित ठिकाणच्या रहिवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. परंतु त्यानंतरही यातील अनेक ठिकाणी डास निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात न आल्याने पालिकेने ११,२३७ जणांना नोटिसा बजावल्या व त्यांच्याकडून २२ लाख ६ हजार रुपये दंड वसूूल केला. या कारवाईनंतरही प्रतिबंधात्मक उपाय न राबवणाऱ्या ६३७ मुंबईकरांविरुद्ध पालिकेने न्यायालयात खटला दाखल केला आहे.

गेली पाच वर्षे डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पण मुंबईकरांकडून डास निर्मूलनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. डासाच्या अळ्यांची उत्पत्ती होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेऊन पालिकेला सहकार्य करावे.

राजेंद्र नारिंग्रेकर, कीटकनाशक विभागप्रमुख

First Published on October 5, 2017 3:38 am

Web Title: dengue issue in mumbai bmc