मुंबईत हळूहळू हातपाय पसरत असलेल्या डेंग्यू आजाराने आणखी एक बळी घेतला असून आतापर्यंत डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या पाचवर गेली आहे. वाळकेश्वर आणि नेपियन सी भागात डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळले आहेत.
वाळकेश्वर भागात राहणाऱ्या ५५ वर्षांच्या एका महिलेला २९ सप्टेंबरला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एनएस १ आणि एलायझा चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ही महिला गेल्या आठवडय़ात डेंग्यूला बळी पडली. गेल्या आठवडय़ात वाळकेश्वर भागात एकाच रुग्णालयात डेंग्यूच्या २० रुग्णांना दाखल करण्यात आले, तर नेपीयन सी भागात एकाच घरातील चौघांना डेंग्यूने ग्रासले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात वाळकेश्वरच्या सेंट एलिझाबेथ रुग्णालयात डेंग्यूच्या २१ रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या महिन्यात तर येथे डेंग्यूच्या ५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले; तथापि पालिकेच्या संसर्गजन्य रोग विभागाने याच कालावधीत संपूर्ण शहरात डेंग्यूच्या फक्त ४१ प्रकरणांची नोंद केली.
आकडय़ांमधील या तफावतीचे कारण सांगताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, ‘नॅशनल व्हेक्टर कंट्रोल’ नियमावलीनुसार ज्या रुग्णांची डेंग्यूची ‘अँटिजेन चाचणी’ सकारात्मक येते, त्यांना संभाव्य किंवा संशयित रुग्ण समजले जाते. रुग्णालये मात्र त्यांची डेंग्यूचे रुग्ण म्हणून नोंद घेतात. चाचणीच्या ‘एलायझा’ किंवा ‘पीसीआर’ या पद्धतीनुसार प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर डेंग्यूचे प्रकरण निश्चित झाल्याचे मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, बहुतांश रुग्ण आणि डॉक्टर्सही डेंग्यूसाठी ‘एलायझा’ किंवा ‘पीसीआर’ चाचण्या न करता, तुलनेने अधिक स्वस्त आणि विश्वासार्ह असलेली ‘एनएस-१ अँटिजेन चाचणी’ करतात. ज्या रुग्णाचा प्रयोगशाळेतील चाचणीचा अहवाल सकारात्मक येतो, त्याची माहिती पालिकेला दररोज दिली जाते. डेंग्यूच्या रुग्णांपैकी बहुतेकांची ‘एनएस-१ अँटिजेन चाचणी’ पॉझिटिव्ह आली, असे सेंट एलिझाबेथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बलदोटा यांनी सांगितले.