07 March 2021

News Flash

‘आपली चिकित्सा’  योजना रखडणार?

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील रुग्णालयात सेवा सुरू झाली असली तरी कराराप्रमाणे अनेक बाबींची पूर्तता केली जात नाही.

दुसऱ्या कंपनीलाही कारणे दाखवा नोटीस

डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस या पावसाळी आजारांनी शहरात थैमान घातलेले असताना मात्र ५० आणि १०० रुपये दरांत सर्व चाचण्या करून देणारी आपली चिकित्सा योजना चांगलीच रखडली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे आता यातील दुसऱ्या कंत्राटदारालाही कारणे दाखवा नोटीस पालिकेने बजावली आहे.

गेल्या महिनाभरात पालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे १३४, मलेरियाचे ७६७ आणि लेप्टोस्पायरोसिसचे ४५ रुग्ण दाखल झाले आहेत, तर १८९४ डेंग्यू संशयित रुग्णांनी उपचार घेतले. शहरात साथीचे आजार बळावले असून त्यासाठीच्या चाचण्यासाठीची गर्दीही वाढली आहे. खासगी प्रयोगशाळांकडून रुग्णांची होणारी लूट थांबविण्यासाठी म्हणून रुग्णांना परवडेल अशा दरात चाचण्या करून देणारी आपली चिकित्सा योजना पालिकेने २०१७ साली जाहीर केली. मात्र दोन वर्षे उलटली तरी अजून रुग्णांना याचा फायदा सुरू झालेला नाही.

वर्षभराच्या रखडपट्टीनंतर नोव्हेंबर २०१८ साली मेट्रोपॉलिस हेल्थकेअर आणि थायरोकेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपन्यांसोबत सुमारे ७९ कोटी रुपयांचा करार पालिकेने केला. सहा महिन्यांनंतर जून २०१९ मध्ये संथगतीने या दोन्ही कंपन्यांनी कामकाज सुरू केले. नेमून दिलेल्या रुग्णालयांमध्ये कामकाज सुरू न केल्याने जूनमध्ये थायरोकेअर कंपनीला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मेट्रोपॉलिसने त्यावेळी कामकाज सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजूनही पूर्णपणे कामकाज सुरू न केल्याने आता याही कंपनीला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील रुग्णालयात सेवा सुरू झाली असली तरी कराराप्रमाणे अनेक बाबींची पूर्तता केली जात नाही. पालिकेच्या १७५ दवाखान्यांपैकी १०५ दवाखान्यांमध्ये आणि २८ प्रसूतिगृहांपैकी तीन रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे.  तसेच कंपनीने अद्याप रुग्णांच्या चाचण्यांबाबत माहिती देणारा डॅशबोर्डही उपलब्ध करून दिलेला नाही. पालिकेने या सर्व बाबी पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:04 am

Web Title: dengue malaria leptospirosis akp 94
Next Stories
1 रक्तदानासाठी ओळखपत्र आवश्यक
2 तपास चक्र : नीट लावलेल्या चपला
3 जाणून घ्या आरेमधील वृक्ष तोडीच्या मुद्द्यावर काय आहे अमित ठाकरेंचे मत
Just Now!
X