प्रजा फाऊंडेशनचा अहवाल; रक्तदाबाच्या रुग्णांची संख्याही कमी

मुंबईकरांना विविध आजारांनी ग्रासले असले तरी हिवताप, डेंग्यू, कॉलरा, अतिसार या साथींच्या आजारांसह मधुमेह आणि उच्च रक्तदाब या शहरी मानल्या जाणाऱ्या आजारांच्या प्रमाणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झालेली असल्याचे प्रजा फाऊंडेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मुंबईकरांच्या आरोग्यविषयक अहवालामधून निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत हिवतापांच्या रुग्णांत तब्बल ३९ टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबईतील जनतेच्या आरोग्याच्या स्थितीचा अहवाल प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार हिवताप (मलेरिया), डेंग्यू, कॉलरा, अतिसार या साथीच्या आजारांच्या संख्येत घट झाल्याचे नमूद केले. आणि मधुमेह आदी आजारांच्या संख्येत घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्ये मागील पाच वर्षांपासून घट होत असल्याचे आशादायक चित्र या आकडेवारीवरून दिसून येते. २०१३-१४ साली १८,३९८ हिवतापाचे रुग्ण नोंदविण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये यामध्ये तब्बल ३९ टक्क्यांनी घट होऊन ११,१६३ वर आलेली आहे.  डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २०१६-१७ या वर्षांत १७ हजार ७७१ होती. २०१७-१८ या वर्षांत डेंग्यूचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होऊन रुग्णांची संख्या १४,३४५ वर आली.

कॉलराचे रुग्णही मागील वर्षांच्या तुलनेत १०९ वरून २७ वर आलेले आहेत. मात्र टायफॉइडच्या रुग्णांत किंचित वाढ झालेली आहे. मागील वर्षी ४,४१३ एवढे रुग्ण होते. ते या वर्षांत ४,६३९ एवढे वाढलेले आहेत.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्येही किंचित घट झाली असून २०१३-१४ साली ३५,६३७ रुग्ण नोंदले गेले. २०१७-१८ मध्ये ३४,१२८ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे आढळले. उच्च रक्तदाबामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या मात्र लक्षणीय आहे. २०१३-१४ मध्ये ४,६८१ रुग्णांचा उच्च रक्तदाब कारणास्तव मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २०१५-१६ मध्ये ही संख्या ५६०१ वर गेली आहे.

मधुमेहाच्या रुग्णांत दोन हजारांनी घट

मधुमेहाच्या रुग्णांमध्येही चालू वर्षांत दोन हजारांनी घट झाली आहे. मागील आर्थिक वर्षांत मधुमेही रुग्णांची संख्या ३२,५२० वरून या वर्षांत ३०,२७९ एवढी झालेली आहे. अतिसाराच्या रुग्णांची संख्या १ लाख ६४३ वरून ९५,२२४ एवढी कमी झालेली आहे. मागच्या पाच वर्षांत अतिसाराच्या रुग्णांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली.