गेल्या दोन महिन्यांमध्ये १२ रहिवाशांना डेंग्युची बाधा झाल्याले वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील आलिशान सोसायटीत डासांच्या अळ्या सापडल्या असून पालिकेच्या आरोग्य विभागाने सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर लवकरच सुनावणी होणार आहे.
वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी रोडवरील एमआयजी क्रिकेट क्लबच्या मागे आलिशान अशी ‘जेड गार्डन’ इमारत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये या इमारतीतील १२ रहिवाशांना डेंग्युची बाधा झाली होती. मात्र आज या रहिवाशांची प्रकृती उत्तम आहे. या इमारतीमध्ये डेंग्युचे रुग्ण असल्याची माहिती स्थायनिक नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. माहिती मिळताच शनिवारी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या ‘जेड गार्डन’मध्ये धाव घेतली. कसून पाहणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना इमारतीच्या ‘डक’मध्ये डासांच्या अळ्या सापडल्या. ‘जेड गार्डन’च्या सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्रन आणि सचिव बद्रेशकुमार कामदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आता लवकरच या प्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे सुनावणी सुरू होईल. या दोघांविरुद्ध लवकरच समन्स बजावण्यात येणार असून त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. अनुपस्थित राहिल्यास या दोघांविरुद्ध वॉरंट काढण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये ‘जेड गार्डन’मध्ये रहिवाशांची वाहने धुण्यासाठी अनधिकृतपणे नळजोडणी उपलब्ध करण्यात आली होती. गाडय़ा धुणारे उरलेले पाणी इतरत्र फेकून देत होते. नळातून वाहणारे पाणी आणि फेकलेले घाणेरडे पाणी याचा योग्य प्रकारे निचरा होत नव्हता. पालिकेला अंधारात ठेऊन अनधिकृतपणे घेतलेल्या नळजोडणीला काही रहिवाशांनी विरोध केला होता.
अखेर याबाबत पालिकेच्या जल विभागाकडे तक्रार केल्यानंतर ही नळजोडणी तोडण्यात आली. तसेच वातानुकूलित यंत्रणेसाठी ‘डक’ तयार करण्यात आले होते. या डकमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या आढलून आल्या आहेत. पालिकेने अध्यक्ष व सचिवावर नोटीस बजावून गुन्हा दाखल केल्यामुळे तात्काळ हे ‘डक’ बुजविण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापुढे डेंग्यूविरोधी उपाययोजनांच्या संदर्भात जागृती मोहिम अधिक व्यापक करण्यात येईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने या वेळी सांगितले.
१३,२१५ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात टाळाटाळ करणाऱ्या तब्बल १३,२१५ जणांविरुद्ध जानेवारी ते ऑक्टोबर या काळात पालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजन न केल्यामुळे व्यक्तीस हिवताप, डेंग्यु झाल्याचे उघडकीस आल्यास संबंधितांवर नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानंतर महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात येत आहेत.
डासांची १,२८२ उत्पत्ती स्थाने नष्ट
स्वच्छ पाण्यात होणाऱ्या डेंग्युच्या अळ्या नष्ट करण्यासाठी पाण्याच्या पिंपामध्ये टेमिफॉस अळीनाशक औषध टाकण्यात येत आहे. आतापर्यंत आरोग्य विबागातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांना सप्टेंबरमध्ये घराबाहेरील व घरातील डेंग्युचा प्रादुर्भाव पसरविणारी सुमारे १,२८२, तर ऑक्टोबरमध्ये १,१८० उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात यश आले.
गप्पी मासे सोडले
मुंबईमध्ये जलसाठे आणि पाण्याच्या उघडय़ा विहिरी मोठय़ा संख्येने आहेत. अशा सुमारे ४, ७४४ जलसाठय़ांमध्ये अळ्या निर्माण होऊ नयेत यासाठी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या मालमत्तांमध्ये ७,१९२ पाण्याच्या टाक्या असून त्यापैकी ६,८६५ टाक्या डासप्रतिबंधक आहेत.
बांधकामात फवारणी
*मुंबईमध्ये तब्बल २,६४४ ठिकाणी बांधकामे
*हिवताप वा डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या बांधकाम क्षेत्रांमध्ये भिंतींवर कीटकनाशकांची, तर पाण्याच्या -साठय़ामध्ये अळीनाशकांची फवारणी  
*भंगार साहित्याची विल्हेवाट