चार डॉक्टरांना डेंग्यूची लागण

चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे केईएम रुग्णालयात डेंग्यूच्या अळ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील वसतिगृहातील कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. यानंतर डॉक्टरांची वसतिगृहे आणि रुग्णालयातील स्वच्छता याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

सध्या डेंग्यूबाधित डॉक्टरांची तब्येत सुधारली असून वरिष्ठांकडून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून सर्वसामान्यांबरोबरच निवासी डॉक्टरांनाही त्याची बाधा झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अधिक सतर्क झाले असून वसतिगृहांची तपासणी केली जात आहे. मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी कीटकनाशक विभाग मुंबईतील २४ वॉर्डामध्ये डेंग्यूची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र असे असले तरी ऑगस्टमध्ये संशयित डेंग्यूच्या १६७० व संशयित लेप्टोच्या ४२८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले, तर मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होते. त्यामुळे या दोन महिन्यांत नागरिकांनी स्वच्छता आणि आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. डेंग्यूपाठोपाठ नागरिकांसाठी धोकादायक लेप्टो आजारामुळे जानेवारी ते ऑगस्टच्या दरम्यान ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मागील वर्षी हे प्रमाण १८ इतके होते.

घ्यावयाची काळजी

 वातानुकूलन यंत्र, फ्रिज वेळोवेळी स्वच्छ करावेत.

 घरातील बांबू, मनी प्लांटमधील पाणी बदलावे.

 घराच्या छतावरील जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट काढून टाकाव्यात.

 घरांच्या खिडक्यांना मच्छरप्रतिबंधक जाळ्या लावून घ्याव्यात.