शैलजा तिवले

सतत बदलते वातावरण आणि अनियमित पाऊस यामुळे मागील तीन महिन्यांत राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जवळपास दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. विशेषत: सप्टेंबर महिन्यामध्ये डेंग्यूचा प्रसार झपाटय़ाने वाढला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ३४ टक्क्यांहून अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली आहे.

वर्षां ऋतूत प्रामुख्याने आढळणाऱ्या डेंग्यूचा प्रभाव यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर उजाडला तरी कायम आहे. सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबपर्यंत डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असते. त्यात सप्टेंबर महिन्यात अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे या महिन्यात तुलनेने अधिक डेंग्यूचा प्रसार होत असतो. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली. सप्टेंबरमध्ये तर हे प्रमाण दुपटीने वाढत २,७५५ वर पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यांमध्ये २,०४७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली होती. या आकडेवारीनुसार यावर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात जवळपास ७००हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले. यंदा २१ ऑक्टोबपर्यंत २,१८३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. या वर्षभरात डेंग्यूने मृत झालेल्या रुग्णांची संख्या सात आहे. गेल्या वर्षभरात ७० जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला होता. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे यावरून स्पष्ट होते.

यंदा अनियमित पावसाचे प्रमाण अधिक काळ राहिले आहे. त्यात सातत्याने वातावरण बदलते. हे दोन्ही घटक डेंग्यूच्या वाढीसाठी पोषक असल्याने गेल्या वर्षांच्या तुलनेत मागील तीन महिन्यांत डेंग्यूचे प्रमाण अधिक आढळले असल्याची माहिती राज्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

डेंग्यूची लक्षणे

कातडीवर रक्ताळलेले पुरळ येणे, नाक किंवा तोंडातून रक्तस्राव होणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटय़ा होणे, पोटदुखी, डोकेदुखी.

घ्यावयाची काळजी

* भरपूर पाणी पिणे आणि आराम करणे.

* डास चावणार नाहीत यासाठी अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालणे.

* झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.

* घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे.

* पाणी साचून डासांच्या अळ्या निर्माण होतील असे जुने टायर, थर्माकोलचे खोके, नारळाच्या करवंटय़ा आदी वस्तू घरातून काढून टाकणे.