मुंबईत करोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असतानाच डेंग्यूनेही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने डेंग्यूच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस’ डासांची तब्बल १५ हजारांहून अधिक उत्पत्तिस्थाने नष्ट केली आहेत.

गेल्या सहा महिन्यांमध्ये पालिकेच्या कीटकनाशक विभागाने विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरणतलाव आदी एक लाख ७२ हजार ५७२ ठिकाणी तपासणी केली. यापैकी चार हजार ६०१ ठिकाणी हिवतापाचा प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांची उत्पत्तिस्थाने आढळली. ती नष्ट करण्यात आली. डेंग्यूच्या प्रादुर्भावाला कारणीभूत होणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेण्यासाठी या विभागाने ५३ लाख ९२ हजार ७५४ ठिकाणी तपासणी केली. पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल्स, पेल्ट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादींच्या तपासणीदरम्यान तब्बल १५ हजार ५९३ ठिकाणी एडिसची उत्पत्तिस्थाने आढळली असून ती नष्ट करण्यात आली आहेत. छपरावर वा अन्य ठिकाणी ठेवलेले सहा हजार २३२ टायर हटविण्यात आले. तसेच डासांची उत्पत्तिस्थाने होण्याची शक्यता लक्षात घेऊन एक लाख ५८ हजार ५११ अन्य वस्तूही हटविण्यात आल्या.

होतेय काय? : करोनाच्या भीतीमुळे मुंबईतील अनेक नागरिक गावी निघून गेले आहेत. यात झोपडपट्टीतील रहिवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यांच्या घरातील पिंपे पाण्याने भरून ठेवलेली आहेत. अशा पिंपांमध्ये मोठय़ा प्रमाणावर एडिस डासाची उत्पत्तिस्थाने आढळून येत आहेत. त्याचबरोबर टोलेजंग इमारतींमध्येही एडिसची उत्पत्तिस्थाने आढळून येत आहेत. यामुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त होत आहे.

डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे.

– राजेंद्र निरग्रेकर प्रमुख, कीटकनाशक विभाग