मुंबई : मुखपट्टीविना क्रिकेट खेळताना हटकणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २० वर्षांच्या तरुणाला सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे नावेद कुरेशी याने सकृद्दर्शनी उल्लंघन केल्याचे दिसून येते. कुरेशी आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करत अन्य लोकांच्या जीवाला धोका निर्माण केला. त्यामुळेच आरोपीला कठोर अटींवर जामीन देण्यात आला तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन तो करणार नाही. परिणामी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सद्यस्थितीला आरोपीची जामिनावर सुटका करणे उचित वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने कु रेशीला जामीन देण्यास नकार दिला.

कामाठीपुरा परिसरात ४ एप्रिलला कुरेशी आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. त्यावेळी संबंधित पोलिसाने त्यांना मुखपट्टी न लावण्यावरून हटकले. त्यानंतर कुरेशी आणि त्याच्या मित्रांनी पोलिसाला मारहाण केली. त्यात पोलिसाच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर कुरेशीला अटक करण्यात आली. या प्रकरणी एक आरोपी अल्पवयीन असून अन्य आरोपी फरारी आहेत. महानगरदंडाधिकाऱ्याने जामीन नाकारल्यानंतर कुरेशीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याने त्याच्यावरील आरोपांचे खंडन करताना पोलिसांनी या प्रकरणात त्याला गोवल्याचा दावा केला होता.