पुण्यातील रंगूनवाला दंत वैद्यकीय या खासगी अल्पसंख्याक महाविद्यालयातील पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमडीएस) ३४ रिक्त जागा ‘एआयपीजीडीईई’ या केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेतून ३१ मेपर्यंत भरण्याची मुभा सोमवारी उच्च न्यायालयाने दिली.

रंगूनवालामध्ये एमडीएसच्या एकूण ४८ जागा आहेत. यापैकी ५० टक्के म्हणजे २४ जागांचे प्रवेश ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) कायद्या’नुसार संस्थास्तरावर करण्याची मुभा देण्यात आली होती. तर उर्वरित ५० टक्के जागांचे प्रवेश ‘प्रवेश नियंत्रण प्राधिकरण’ या सरकारची देखरेख असलेल्या यंत्रणेमार्फत करण्यात येणार होते. या २४ पैकी ९ जागा प्राधिकरणाला भरता आल्या. या सर्व जागांचे प्रवेश राज्य स्तरावर झालेल्या सीईटीतून करण्यात आले होते. उर्वरित जागा २० मे रोजी नियमानुसार संस्थेकडे भरण्याकरिता सुपूर्द करण्यात आल्या. मात्र, या १५ आणि संस्थास्तरावर रिक्त राहिलेल्या जागा अशा एकूण ३४ जागा या संस्थेला राज्यातीलच (डोमिसाईल असलेल्या) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून भरणे बंधनकारक होते. ह्य़ा अटीमुळे या जागा भरल्या गेल्या नाहीत. परिणामी त्या एआयपीजीडीईई या केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेतून भरण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका संस्थेतर्फे करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे ३१ मेपर्यंत एआयपीजीडीईईतून या रिक्त जागांचे प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे.

अर्थात प्रवेशाकरिता संस्थेकडे अवघा एक दिवस आहे. त्यामुळे एका दिवसात ३४पैकी नेमक्या किती जागा भरल्या जातील यात शंका आहे. मात्र, या निर्णयामुळे खासगी अल्पसंख्याक महाविद्यालयांवर अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेला कोटा राज्यातीलच विद्यार्थ्यांमधून भरण्याचे बंधन शिथील झाले आहे.