20 October 2019

News Flash

उपनगरांतील पालिका रुग्णालयांत दंत उपचारांचा पेच

काही रुग्णालयांमध्ये साधने उपलब्ध असूनही सकाळी ८ ते १२ या अर्धवेळेसाठीच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना सेवा घेणे शक्य होत नाही

(संग्रहित छायाचित्र)

शैलजा तिवले

आवश्यक साधनसामग्री नसल्याने दंतचिकित्सकांचा निरुपाय

मुंबई महापालिकेची उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने अद्ययावत करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करूनही यामध्ये कार्यरत असलेल्या दंतचिकित्सकांकडे उपचाराची साधनेच उपलब्ध नसल्याने रुग्णांना मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयातच फेऱ्या घालाव्या लागत आहेत.

उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दंत उपचार सुविधा सुरू करण्यासाठी पालिकेने २०१६ मध्ये ४५ दंतचिकित्सकांची अर्धवेळासाठी नियुक्ती केली. यातील जवळपास दहा दंतचिकित्सक उपनगरीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असून उर्वरित पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सेवा देत आहेत. मात्र घाटकोपर येथील राजावाडी आणि वांद्रे येथील भाभा रुग्णालय वगळता अन्य उपनगरीय रुग्णालयांमध्ये खुर्ची आणि काही मूलभूत साधने वगळता अन्य आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाला केवळ तपासणी, दात सफाई आणि दात काढणे याच सुविधा देणे डॉक्टरांना शक्य आहे.

दिवसाला जवळपास ३० रुग्ण उपचारासाठी येतात. यातील बहुतांश रुग्ण हे दातदुखीमुळे येत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही समर्थ असूनही केवळ साधने उपलब्ध नसल्याने त्यांना नायर दंत रुग्णालयात पाठवावे लागत असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.

काही रुग्णालयांमध्ये साधने उपलब्ध असूनही सकाळी ८ ते १२ या अर्धवेळेसाठीच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना सेवा घेणे शक्य होत नाही. दिवसाला ३० रुग्ण उपचारासाठी येत असून एका रुग्णावर अर्धा तासाचा कालावधी लागतो. तेव्हा पूर्ण वेळेसाठी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णालयांनीही पालिकेकडे केली आहे.

रुग्णांना येथे उपचार मिळणार नाहीत म्हणून नायरला पाठविले की ते आमच्यावरच राग काढतात. तुम्हाला ४०-५० हजार पगार देऊन इथे कशासाठी नोकरी दिली आहे, असा प्रश्न विचारतात. आम्हाला केवळ १५ हजार रुपये मासिक वेतन मिळते आणि साधनेच उपलब्ध नाहीत, हे आता रुग्णांना कोणत्या तोंडाने सांगणार, असेही दवाखान्यामध्ये दंत उपचार देणारे डॉक्टर मांडतात.

प्रयोगात्मक प्रकल्प म्हणून पालिकेने तीन दवाखान्यांमध्ये नायर दंत रुग्णालयातून सामुग्री आणून पुरविण्याचे जून २०१८ मध्ये मंजूर झाले होते. वापर करण्यासाठी मुलभूत साधनेच (फिलिंगची उपकरणे) पालिकेने न दिल्याने केवळ सामुग्री घेऊन काम कसे करावे, असा या दवाखान्यातील डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. याबाबत पालिकेकडे डिसेंबर २०१८मध्ये तक्रार डॉक्टरांनी दाखल केली आहे. यातील चुनाभट्टी येथील दंतविभाग दुरुस्तीच्या कामामुळे कार्यरत नसल्याने दिलेल्या सामुग्रीची मुदत संपत आल्याचेही या दवाखान्यातून एप्रिल २०१९ मध्ये कळविण्यात आले आहे.

दवाखान्यामध्ये मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. त्या सध्या दिल्या जात आहेत. प्रयोग करण्यासाठी म्हणून आम्ही दोन-तीन रुग्णालयांमध्ये दंतरुग्णालयातून काही सामुग्री मागवून पुरविली होती. परंतु रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे सामुग्री नाही म्हणून तक्रार करणे योग्य नाही, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

सामुग्री देऊनही दवाखान्यांनी काम न केल्याचा आरोप पालिकेने एकीकडे केला आहे.  तर निवड केलेल्या दवाखान्यांमध्ये काम का होऊ शकले नाही, याची पडताळणी करण्याची तसदीही पालिकेने केलेली नाही.

रुग्णालयांमधील दंतउपचाराची आवश्यकतेचा विचार करून हे पद पूर्णवेळ करणे आवश्यक आहे. रुग्णालयांचा आढावा घेऊन सुविधांबाबतचा आणि पूर्णवेळ पदाची मागणी करणारा प्रस्ताव लवकरच आयुक्तांपुढे सादर केला जाईल, असे पालिका उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.

नायर दंत रुग्णालयाचे ताशेरे

२०१८ मध्ये नायर दंत रुग्णालयाने उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांमधील दंतसेवेची तपासणी करून पालिकेला अहवाल सादर केला होता. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आवश्यक साधने आणि सामानाची कमतरता असल्याने केवळ दातसफाई, दात काढणे एवढेच उपचार केले जातात. दंतचिकित्सकाच्या मदतीला मदतनीस असणे आवश्यक आहे. दवाखान्यांमध्ये साधनांच्या स्वच्छतेपासून सर्व कामे डॉक्टरांनाच करावी लागतात. उपलब्ध साधने ठेवण्यासाठीची सोय उपलब्ध नाही. तेव्हा साधने उपलब्ध करावीत, जेणेकरून ६० ते ७० टक्के दंतउपचार देणे डॉक्टरांना शक्य होईल, अशी सूचना या अहवालात केली होती.

First Published on April 25, 2019 2:53 am

Web Title: dental treatment screws in municipal hospitals in the suburbs