मटणाचे भाव कमी होण्याची शक्यता; क्षमतेच्या ५० टक्के  प्राण्यांची कत्तल

मुंबई: टाळेबंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले देवनारमधील पालिकेचे पशुवधगृह प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा सुरू होणार आहे. बकऱ्यांची विक्री आणि कत्तल पूर्णत: बंद असल्यामुळे बाजारात वाढलेले मटणाचे भाव त्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या क्षमतेच्या फक्त ५० टक्केच प्राण्यांची कत्तल केली जाईल, अशी अट घातली आहे.

टाळेबंदीमुळे आधीच मासे महाग झालेले आहेत. पावसाळा जवळ आल्यामुळे माशांची आवकही कमी आहे. कोंबडीचेही भाव वाढलेले आहेत. टाळेबंदीमुळे पुणे, नागपूर, मुंबई येथील मोठे पशुवधगृह बंदच असल्यामुळे मटणविक्रीवर परिणाम झाला होता. त्यामुळे कत्तलखाने सुरू करावे, अशी मागणी ‘ऑल इंडिया जमियातुल कुरेशी’ या मांसविक्रेत्यांच्या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आता पालिकेने जुलैपासून कत्तलखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवनार कत्तलखान्यात पशुवधगृहात प्राण्यांची खरेदी-विक्री आणि कत्तल अशा अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यामुळे एका वेळेला साधारण १००० लोक असतात. दर मंगळवारी-शुक्रवारी प्राण्यांचा बाजार भरतो. गर्दी टाळण्यासाठी नव्या नियमावलीनुसार काम के ले जाईल. तसेच प्राण्यांचा बाजार भरणार नाही. कमीत कमी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. दर गुरुवारी कत्तलखाना बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईची गरज भागेल

देवनार पशुवधगृहात ३००० बकऱ्यांचा, ३०० डुक्कर आणि ३०० म्हशींची कत्तल केला जात होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर वधगृह सुरू केल्यानंतर दर दिवशी १५० म्हशी, १५० डुक्कर, तर सुमारे दीड हजार बकऱ्यांचीच कत्तल केली जाईल. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांचीच गरज भागेल एवढेच हे प्रमाण असेल.

अशी आहे नियमावली

* म्हैस/ रेडे, बकरे, शेळ्या, मेंढय़ा, वराह (डुक्कर) यांची कत्तल करता येणार.

* कर्मचारी आणि वधासाठी येणारे व्यावसायिक यांना सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, हॅन्डग्लोव्हज घालणे बंधनकारक

* जनावरांचा बाजार भरविण्यास मनाई.

* जनावरांची कत्तल केल्यानंतर चरबी, यकृत, चामडे यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी परवानाधारकांचीच राहणार आहे.

* धार्मिक कार्यासाठी बकरे कत्तल करण्यास मनाई.

* २ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सात दिवसांसाठीचा परवाना मिळणार .