देवनार, मुलुंड कचराभूमीत लागणाऱ्या आगीवरुन शिवसेनेला लक्ष्य केले जात असल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तीन महिन्यात तोडगा न काढल्यास शिवसेनेला नाईलाजाने काही पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

देवनार व मुलुंड कचराभूमीत आगी लागण्याचे प्रकार थांबत नसून राज्य सरकार आणि महापालिकेवर टीकेचा भडिमार होत आहे. लाखो नागरिक हैराण असून आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेन व भाजपला त्याचा फटका बसण्याची भीती आहे. कचराभूमी, नालेसफाई गैरव्यवहारांवरुन मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे व आरोप केले आहेत. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली.

‘आधी अमेठीतील कचरा साफ करा’

राहुल गांधी यांना देवनार कचराभूमीवरील परिस्थिती दाखविणे, म्हणजे काँग्रेसने आपली पापे आरशात दाखविण्यासारखे असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने कचराप्रक्रिया प्रकल्पांसाठी लीजवर जागा न देण्यास परवानगी न दिल्याने ती सुरु होऊ शकली नाहीत. त्यामुळे आपल्याच दोषामुळे उद्भवलेली परिस्थती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे राहुल गांधींना दाखविणार असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. गांधी यांनी देवनारला भेट देण्याआधी अमेठीतील कचरा साफ करण्यासाठी पावले टाकावीत, अशी टिप्पणी शेलार यांनी केली आहे. अमेठीतील कचऱ्याच्या अवस्थेविषयी भाजप कार्यकर्ते गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.