देवनार कचराभूमीत रविवारी पुन्हा आग लागली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग विझविण्यासाठी पुन्हा अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. पाच वाजल्यानंतर आग आटोक्यात आली व सात वाजता पूर्ण विझल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
देवनार कचराभूमीवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे सुरक्षा व प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या कचराभूमीतील आग शमविण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, कचराभूमीचे प्रचंड क्षेत्र व अशास्त्रीय पद्धतीने टाकला जाणारा कचरा यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. २७ जानेवारी लागलेली आग विझविण्यास चार दिवस लागले होते. त्यानंतरही दोन वेळा देवनारमधील कचऱ्याने पेट घेतला होता.