‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळण्याच्या सरकारच्या निर्णयावरून काँग्रेसवर टीका सुरू झाली असतानाच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद देवरा यांनी या निर्णयविरोधात वेगळा सूर लावल्याने काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.
‘आदर्श’चा चौकशी अहवाल फेटाळण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याने काँग्रेसवर टीका करायला भाजपला संधीच मिळाली. विशेषत: मुंबईतील सभेत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या दुटप्पीपणावरून टीका केली होती. कलंकित मंत्र्यांना वाचविण्याचा वटहुकूम रद्द करायला भाग पाडणे किंवा लोकपाल कायद्यासाठी पुढाकार घेऊन राहुल यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला असतानाच पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेसवर टीका करण्यास विरोधकांना संधीच मिळाली. राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात वक्तव्य केले असतानाच महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते.

राष्ट्रवादीचीही चौकशीस तयारी
अहवाल फेटाळण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने एकमताने घेतला होता. मिलिंद देवरा किंवा काँग्रेसची चौकशीची मागणी असल्यास राष्ट्रवादीही या मताशी सहमत असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

मिलिंद देवरा यांचे ‘ते’ आणि ‘हे’ वक्तव्य
*     ‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळल्याने काही प्रश्न उपस्थित झाले असल्यास त्याची चौकशी होणे आवश्यकच आहे. कितीही मोठा नेता वा नोकरशहा असो, चौकशीत सत्य बाहेर आले पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरून व्यक्त केले.
*     काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळेच हा अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिक्रियेवरून सूचित झाले होते. स्वत: मुख्यमंत्री अहवाल फेटाळण्याच्या विरोधात होते.
*     यापाठोपाठ मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने काँग्रेसमध्ये, विशेषत: राहुल गांधी यांच्या गोटात वेगळा विचार सुरू झाल्याचे सूचित होते.
*     कलंकित मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबद्दल मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून प्रतिक्रिया उमटली असतानाच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी तो वटहुकूम टराटरा फाडण्याच्या लायकीचा असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळेच ‘आदर्श’वरून मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्त्व प्राप्त होते.
*     राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मिलिंद देवरा हे कोणत्याही संवेदनशील विषयावर मत व्यक्त करणार नाहीत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गेले दोन दिवस मुख्यमंत्री चव्हाण हे नवी दिल्लीत असून, त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत.
*   माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाचविण्यासाठी हा अहवाल फेटाळण्यात आला असला तरी त्यातून पक्षाच्या यशावर परिणाम होईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत मांडल्याचे समजते.