रसिका मुळ्ये

करोनाच्या प्रादुर्भावामुळे कोलमडलेल्या येत्या शैक्षणिक वर्षांसाठी प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन तासिका आणि उपक्रमांचे वेळापत्रकही तयार करण्यात येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढील शैक्षणिक वर्षांबाबत अनिश्चितता आहे. सध्या राज्यमंडळाच्या शाळांचा वर्षभराच्या नियोजनानुसार उन्हाळी सुट्टीचा काळ आहे. मात्र, जूनमध्ये दरवर्षीप्रमाणे शाळा सुरू होऊ शकतील का याबाबत संदिग्धताच आहे. शैक्षणिक वर्ष उशीरा सुरू झाल्यास पुढील वर्षीच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. अध्यापनासाठी एकूण कमी कालावधी पुढील वर्षी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमातील काही भाग पुढील वर्षांसाठी वगळण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी जे घटक महत्वाचे आहेत ते घटकच शिकवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पालक संघटनांनीही अशा स्वरूपाच्या मागणी केली होती.

ऑनलाईन अभ्यासाचे वेळापत्रक

टाळेबंदीचा कालावधी वाढला किंवा टाळेबंदी वाढली नाही तरी विद्यार्थ्यांना लगेच शाळेत बोलावण्यायोग्य परिस्थिती नसल्यास त्यावर ऑनलाईन शिक्षणाचा तोडगा सर्वच शिक्षण मंडळानी अमलात आणला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) नुकतेच ऑनलाईन तासिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदही ऑनलाईन तासिकांचे वेळापत्रक तयार करत आहे. कोणत्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना रोज कोणता घटक शिकवावा, प्रकल्प, विद्यार्थ्यांना स्वयं-अध्ययनासाठी द्यायचे घटक याचे तपशील परिषद जाहीर करणार आहे.

शाळा भरवणे आव्हानात्मकच

टाळेबंदी मागे घेण्यात आली तरीही करोनाचा धोका नजीकच्या काळात संपणार नसल्याचेच अनेक संशोधनातून पुढे आले आहे. शहरी भागांतील अनेक शाळांमध्ये एकेका वर्गात अगदी ६० ते ७० विद्यार्थीही बसतात. मात्र, येत्या काळात वर्गातील दाटीवाटी टाळावी लागेल. त्यादृष्टीने पुढील शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्याचे आव्हान शाळा आणि विभागासमोर आहे. टप्प्याटप्प्याने  वर्ग भरवणे अशा काही पर्यायांची पडताळणी करून शाळा पुन्हा भरवण्याचे आव्हाने पेलावे लागणार आहे.

सुट्टय़ांमध्ये कपात?

शालेय शैक्षणिक वर्षांत गणपती, दिवाळी आणि नाताळ या साधारण पाच ते दहा दिवसांच्या सुट्टय़ा असतात. त्या सुट्टय़ांच्या कालावधीत काही प्रमाणात कपात होण्याचीही शक्यता आहे.