पुढील शैक्षणिक वर्षांचा किती कालावधी मिळणार याबाबत संदिग्धता असल्यामुळे दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. मात्र, अभ्यासक्रम कमी करण्यासाठी अभ्यास मंडळांनी मात्र विरोध केला आहे.

याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारती, राज्यमंडळातील अधिकारी आणि विषय समितीचे अध्यक्ष यांची गुरुवारी बैठक झाली. मात्र, अभ्यासक्रमातील घटक कमी करण्यासाठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी विरोध केला आहे. अभ्यासक्रम प्रत्येक स्तरानुसार विकसित होत असतो. पाठय़पुस्तकातील काही घटक हे आधी शिकलेल्या संदर्भासाठी दिलेले असतात. ते आधी शिकलेल्या संकल्पनेचा पुढील टप्पा शिकण्यासाठी आवश्यक असतात. अचानक नवी संकल्पना शिकवता येत नाही. त्याचप्रमाणे पुढील इयत्तेचा पाया रचला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमात किंवा पाठय़पुस्तकांत ‘अनावश्यक’ असे काही नाही, असे अभ्यास मंडळाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. काही घटक अनावश्यक असतील तर ते इतकी वर्षे अभ्यासक्रमात का समाविष्ट करण्यात आले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रीय मंडळाने काय केले?

केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील वर्षीचा अभ्यासक्रम कमी करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अभ्यासक्रमातील घटक वगळण्याऐवजी शिक्षकांनी वर्गात शिकवण्याचे घटक आणि विद्यार्थ्यांनी स्वत: तयारी करण्याची घटक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. वर्गात करून घेण्याचे काही उपक्रम, सराव हे विद्यार्थ्यांना त्यांचा स्तरावर करण्यासाठी मार्गदर्शन करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनासाठी वेळ कमी मिळाला तरीही आवश्यक त्या सर्व संकल्पना शिकवून होणार आहेत, अशी माहिती सीबीएसई शाळेच्या शिक्षकांनी दिली.

‘विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना अभ्यास मंडळाना दिली आहे. अभ्यासक्रम कमी करताना राज्यमंडळाने तयार केलेला मूल्यमापन आराखडा बदलणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे. अनावश्यक किंवा पुनरावृत्ती असलेला भाग वगळण्याचा विचार करत आहोत.’

– दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

‘जुलैमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार ’

राज्यातील शाळा जूनमध्ये सुरू करता येणार नाहीत. तर जुलैमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गेले काही दिवस १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, संसर्गाची भीती असल्याने मुलांना शाळेत कसे पाठवायचे याबाबत पालक चिंतेत आहेत. या पाश्र्वभूमीवर पवार म्हणाले, की शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जूनमध्ये शाळा सुरू करता येणार नाहीत, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. जुलैमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण त्याबाबत निर्णय झालेला नाही. शाळांचे सुरुवातीचे काही दिवस जाणार असल्याने त्या बदल्यात दिवाळी आणि ख्रिसमसची सुटी द्यायची नाही. तसेच एप्रिलअखेपर्यंत शाळा घेऊन दिवस भरून काढता येऊ शकतात, असेही ते म्हणाले.