कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम

ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा एसटी महामंडळालाही फटका बसला.  पावसामुळे व अन्य कारणांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी झाले आहे.

उत्पन्नात अपेक्षित वाढ न झाल्याने एसटीच्या ११ विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाल्याची माहिती एसटी महामंडळाने सोमवारी दिली. कर्मचाऱ्यांचे अंशत: वेतन देण्यात आल्यानंतर एसटीच्या मुख्यालयातून तातडीने निधी उपलब्ध करून उर्वरित वेतनही दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले जात आहे. नोव्हेंबरचेही वेतन ७ डिसेंबरला देण्यात आले. मात्र केवळ ८० टक्क्यांपर्यंतच वेतन जमा झाले. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.  आर्थिक बाबींमुळे वेतन पूर्ण दिले जात नसल्याचे काही आगारांतील सूचना फलकांवर नमूद केले आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने सोमवारी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण देताना महामंडळाचे उत्पन्न कमी झाल्यानेच कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन अदा केल्याचे सांगितले.

१ डिसेंबरपासून काही विभागांत प्रवासी उत्पन्नात अपेक्षित वाढही झाली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असणारा निधी संकलित करणे संबंधित विभागाला शक्य झाले नाही. त्यामुळेच राज्यातील ३१ विभागांपैकी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन अदा केले. तसेच नांदेड, परभणी, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला विभागांतील एक-दोन आगारांमध्येही अंशत: वेतन अदा केल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.