शिष्यवृत्तीचे पैसे देण्याबाबतची कसलीही ठोस योजना नाही, अल्पसंख्याक शाळांवर कसलाही अंकूश नाही, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची खाजगी संस्थांवर सक्ती केली जाते, मात्र सरकारकडूनच अंमलबजावणी केली जात नाही, पाचवी आणि आठवीचे वर्ग जोडण्याबाबत आता आदेश काढलेत, मग हे वर्ग कधी सुरू होणार अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत विधानभेत गुरूवारी शिक्षण विभागाच्या कारभाराचे पुरते वस्त्रहरण करण्यात आले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांबरोबरच विधानसभा अध्यक्षांनीही या विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना हस्तक्षेपाची सूचना केली.
  चौथीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांना पाचवीचा तर सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने सन २००९ मध्ये घेतला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र त्याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नसल्याबद्दल डॉ. सुजित मिनचेकर यांनी तर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून थकीत राहिल्याबद्दल चंद्रदीप नरके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान शालेय शिक्षण राज्यमंत्री कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचाच पंचनामा केला. कोल्हापूरमधील २२० विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीचे पैसै मिळाले नसून ते दोन महिन्यात देण्याची व्यवस्था केली जाईल. तर पाचवी आणि आठवीचे वर्ग जोडण्याबाबत २ जुलै रोजी अध्यादेश काढण्यात आल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. मात्र त्यांच्या या उत्तराने सतंप्त झालेल्या सदस्यांनी आता आदेश काढलेत, मग वर्ग कधी सुरू होणार, तोवर विद्यार्थाचे होणारे नुकसान कोण भरून देणार अशी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यानंतरही मंत्र्यांकडून ठोस उत्तर न मिळाल्याने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हे दोन्ही प्रश्न राखून ठेवले. शिष्यवृत्तीचे पैसै दोन महिन्यात देण्याची तुमच्याकडे योजना नाही, तसेच वर्ग जोडण्याबाबतही काढण्यात आलेल्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास सहा महिन्याचा कालावधी लागेल, शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणी- बाबत सरकारच गंभीर नाही त्यामुळे या गंभीर विषयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासोबत चर्चा करू असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.