30 September 2020

News Flash

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार : अजित पवार

राष्ट्रवादीने मिशन - २०२२ मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले

(संग्रहित छायाचित्र)

‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत.ज्या कामांच्या बाबतीत शंका येते, म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहेत. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. दहा आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत. यावेळी महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल असेही ते म्हणाले.

आता हौसे नवसे गवसे येतील मात्र त्यांना पदांपासून दुर ठेवा –
समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, आता हौसे नवसे गवसे येतील मात्र त्यांना पदांपासून दुर ठेवा. पदं मिळाली ते पक्ष सोडून गेले सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले. मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत त्यांना दोन वर्ष काही देवू नका त्यांना काम करु द्या असा आदेशही अजित पवार यांनी दिला.
गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत निघत आहे. पोलिसांना चांगली घरे कशी देता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. डबेवाल्यांनाही विश्वास देण्याचा माझ्या सहकार्‍यांचा प्रयत्न आहे. मुंबापुरी सर्वांची आहे त्यांना ती आपली वाटली पाहिजे असे काम आपल्याला करायचं आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. तर, हे मि‌शन शिवसेना व इतर पक्षांच्या विरोधात आहे अशा वावड्या उठवल्या जात आहेत. परंतु आमचे हे मिशन पक्षाचा जनाधार कसा वाढेल यासाठी आहे. जे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे काम होत आहे ते पुर्ववत करण्याचं काम यातून होणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

आपल्या विचाराची महानगरपालिका आली पाहिजे –
शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे ती राहिली पाहिजेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसर्‍या क्रमांकावर राहिली पाहिजे असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापसात संघर्ष न करता पक्षाचे काम कसे वाढेल याकडे लक्ष द्या. आपल्या विचाराचं सरकार आलं आहे तसं आपल्या विचाराची महानगरपालिका आली पाहिजे त्यासाठी नगरसेवक निवडून आणा असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आहे. तर शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे,माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, खासदार माजीद मेमन, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 2:17 pm

Web Title: deputy chief minister ajit pawar criticizes bjp msr 87
Next Stories
1 ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे आणि आशिष शेलारांमध्ये तासभर चर्चा
2 VIDEO: विदेशी मालाच्या होळीचा साक्षीदार असलेला ब्रिज
3 सहार रोड मेट्रो स्थानकाचे ४८ टक्के भुयारीकरण पूर्ण
Just Now!
X