राज्यील नोकरभरती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांना महत्वपूर्ण माहिती दिली. “महाविकास आघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस खाते व कोरोना काळात आरोग्य खाते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे या दोन खात्यांमध्ये प्राधान्याने नोकर भरती सुरु करण्यात आली आहे.” असं त्यांनी सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, “नोकरभरतीबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय अपेक्षित आहे. सध्या पोलीस खात्याची नोकरभरती सुरू केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची नोकरभरती सुरू केलेली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची नोकरभरती सुरू केलेली आहे. तातडीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांना प्राधान्य दिलं आहे. याचबरोबर करोनावर आपल्याला मात करायची आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग हे दोन विभाग यामध्ये महत्वाचं काम करत असतात, म्हणून या दोन विभागांना देखील यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे.”

तर, नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये भारतात नोकरीच्या संधी आणि रोजगार वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. अनेक कंपन्यांनी केलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणांवर नजर टाकल्यास भारतात रोजगारनिर्मितीला अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांनी आता पुन्हा नोकरभरती सुरु केली आहे. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आता नोकरभरती सुरु आहे.