मुंबई : सह्याद्री अतिथिगृहातील बैठक सभागृहांच्या बाहेरील आवाराचे पीओपी छत पडल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतली आणि संपूर्ण सह्याद्री अतिथिगृहाची बांधकाम सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी व आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

मागील आठवड्यात सह््याद्री अतिथिगृहातील एका सभागृहात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विभागाची बैठक सुरू असताना त्या सभागृहांच्या बाहेरील आवारातील पीओपी छत झुंबरासह कोसळले होते. त्या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी त्या अपघाताची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत तो विषय काढला. त्या भागाची दुरुस्ती करण्याबरोबरच सह््याद्री अतिथिगृहातील तशा प्रकारच्या सर्व कामांची तपासणी करून सुरक्षित असल्याची खातरजमा करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीचा वृत्तांतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला दिला.