“राज्य, देश उभारणीत ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला पवार उत्तर देत होते.

“विरोधकांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचं आहे. सभागृहात काम होणं महत्त्वाचं आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते परंतु आम्ही एक विधेयक मंजुर करून घेतलं. विधेयक मंजूर होणंही महत्त्वाचं असतं,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “सभागृह हे नियमाप्रमाणं चालतं. कामकाज सल्लागार समिती असते. सभागृहाचे अध्यक्ष असतात. एखादा विषय घ्यायचा असेल तर ऐनवेळीही घेता येतो. सर्वजण ठरवतील त्याप्रमाणे सभागृहाचं कामकाज चालेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी भाजपा नेते राम कदम यांनीदेखील यावर बोलताना या मुद्द्यावर कोणाचीही कोंडी करण्याचा प्रश्न नसल्याचे म्हणाले. “आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे,” असं त्यांनी नमूद केलं. तर आमदार बच्चू कडू यांनीदेखील या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला. “महापुरूषांचा गौरव करण्याबाबत कोणतंही दुमत नाही. परंतु भाजपानं त्यावरून राजकारण करणं टाळावं,” असं ते म्हणाले.