मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, आता पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी देखील १४ दिवसांकरिता घरातच स्वतःचे विलगीकरण केले आहे. आयुक्तांची देखील चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
मिरा-भाईंदरमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात आता करोनाने महानगरपालिकेत देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.आतापर्यंत मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील १२ पेक्षा अधिक अधिकाऱी आणि कर्मचा-यांना करोनाची लागण झाली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना देखील करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी आपली करोना चाचणी केली होती. मंगळवारी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांना देखील विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. याचा फटका खुद्द आयुक्त डॉ विजय राठोड यांना देखील बसला आहे. या पार्श्वभूमीवर आय़ुक्त १४ दिवसांसाठी घरातच विलगीकरणात राहणार आहेत. त्यांची देखील करोनाची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
मिरा-भाईंदर मधील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याकरिता आयुक्त चंद्रकांत डांगे यांची तडकाफडकी बदली करून, डॉ विजय राठोड यांची नेमणूक करण्यात आली होती.अवघ्या दोन आठवड्यापूर्वीच डॉ विजय राठोड यांनी पदभार स्विकारला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2020 5:49 pm