झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सचिव पदावर अखेर पालिकेचे उपायुक्त रणजित ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकरणात प्रामुख्याने शासनातील वा पालिका, म्हाडातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली जाते. ढाकणे हे सचिव बनणारे पहिलेच पालिका अधिकारी आहेत.

प्राधिकरणातील प्रशासन तसेच विविध कर्मचाऱ्यांच्या बदल्या व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले अधिकार सचिवांना बहाल केलेले असल्यामुळे हे पद तसे महत्त्वाचे मानले जाते. या पदावर प्रामुख्याने महसूल विभागातील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागातील संदीप देशमुख यांची नियुक्ती केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपाठोपाठ सचिवांचीही नव्याने नियुक्ती होणार हे स्पष्ट झाले होते. या पदासाठी महसूल विभागातील डॉ. नितीन महाजन यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु ते नाव काही कारणांमुळे मागे पडले आहे. आता ढाकणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून तसा आदेशही जारी झाला आहे.

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. करोनाकाळात उपायुक्त म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. सफाई कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्यामुळेही ढाकणे वादग्रस्तही ठरले होते. मात्र ढाकणे यांच्या नियुक्तीमुळे प्राधिकरणातील बेशिस्त कर्मचाऱ्यांना वळण लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.