मुंबई : अंधेरी येथील सी. डी. बर्फीवाला शाळेचे उपमुख्याध्यापक राम कांबळे (४७) यांनी शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असून कौटुंबिक प्रश्नांतून ही आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ‘नैराश्यामुळे आत्महत्या करत असून त्यासाठी कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ  नये असे कांबळे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

मालाड येथील रहिवासी असलेले कांबळे हे सी. डी. बर्फीवाला शाळेत गेली २० वर्षे विज्ञान आणि गणित विषयाचे अध्यापन करत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ते शाळेत आले. त्यानंतर साधारण ८ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. आवाज ऐकून शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या मागील बाजूस धाव घेतली. त्यानंतर कांबळे यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती शाळेतील कर्मचाऱ्यांनी दिली. कांबळे यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

या घटनेमुळे शाळेला सुट्टी जाहीर करून तातडीने विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. आठवडाअखेर असल्यामुळे पुढील दोन दिवस शाळा बंद राहणार असून सोमवारनंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे.