*  थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
* मुख्यमंत्र्यांच्या ‘तपासून पाहा’चा गैरअर्थ
कांदिवली पूर्व येथील म्हाडाच्या समतानगर वसाहतीच्या पुनर्विकासात अनेक घोटाळे असतानाच या रहिवाशांना घराबाहेर काढण्यासाठी चक्क कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची बाब उघड झाली आहे. या पत्रावर मुख्यमंत्री ‘तपासून पाहा’ असा शेरा दिला. मात्र या शेऱ्याचा म्हाडाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याने ‘आपल्या पद्धती’ने अर्थ काढून या रहिवाशांना थेट घराबाहेर काढण्याचेच आदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
समतानगर ही म्हाडाची मोठी वसाहत असून तीत २,७६४ रहिवासी राहतात. ही वसाहत दोन लाख १३ हजार ८६७ चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरली असून एकूण १६० इमारती आहेत. तर त्यांच्या ५५ गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांच्या महासंघाने मे. एस. डी. कॉर्पोरेशन यांची विकासक म्हणून नियुक्ती केली होती. या विकासकाने एकत्रित पुनर्विकासासाठी प्रस्ताव सादर केला. ५५ पैकी ४८ गृहनिर्माण संस्थांनी मंजुरी दिल्याचा दावा केला.
या पुनर्विकासासाठी वैयक्तिक संमतीची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट केले होते. परंतु म्हाडाने त्यास आक्षेप घेत हा प्रकल्प रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली.
या नोटिशीत म्हाडाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. ५५ संस्थांपैकी फक्त दहा संस्थांनी ७० टक्के संमतीपत्रे सादर केली आहेत. एकत्रित पुनर्विकास प्रकल्पाशी तुलना केल्यास २७६४ सभासदांपैकी फक्त ३८५ सभासदांचे संमतीपत्र सादर करण्यात आलेले आहे. त्याची टक्केवारी फक्त १४ टक्के आहे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी वस्तुस्थिती असतानाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून समतानगर पुनर्विकासात रहिवाशांनी अडथळा निर्माण केला असल्यामुळे अशा रहिवाशांविरुद्ध म्हाडा कायदा ९५ (अ) नुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.
या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ‘तपासून पाहा’ असा शेरा मारला होता. त्यावर म्हाडाकडून वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात आला होता. परंतु वस्तुस्थिती अहवाल देण्याऐवजी त्यावर म्हाडाचे मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी १६ एप्रिल २०१२ रोजी मुख्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून रहिवाशांना बाहेर काढण्याचीच कारवाई करण्याचे आदेश दिले.