01 June 2020

News Flash

श्रमिक रेल्वे गाडय़ांची रखडपट्टी

बिहार, उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या रांगांमुळे विलंब

संग्रहित छायाचित्र

कामगारांसाठी वसईहून गोरखपूरला सोडण्यात आलेली श्रमिक विशेष रेल्वेगाडी थेट गोरखपूरला न जाता ओडिशामार्गे गेली आणि प्रवास लांबल्याने कामगारांमध्ये गोंधळ उडाला. मात्र नियोजित मार्ग व्यस्त असल्यानेच गाडीला दुसऱ्या मार्गाचा पर्याय द्यावा लागल्याचा खुलासा पश्चिम रेल्वेला द्यावा लागला. मात्र यामुळे कामगारांचे हाल झाले. देशभरातून एकाच वेळी उत्तरेकडे सोडण्यात आलेल्या गाडय़ांमुळे श्रमिक गाडय़ांचे वेळापत्रकच बिघडले आहे. परिणामी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा लांबलेला प्रवास, जेवणाचे हाल व अन्य सुविधांची वानवा होत आहे.

वसई ते गोरखपूर श्रमिक गाडी २१ मे ला सुटल्यानंतर २२ मे ला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकात पोहोचणे अपेक्षित होते. परंतु शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही गाडी ओडिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचली. ३६ तास प्रवास केल्यानंतरही ओडिशामार्गे आल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. यासंदर्भात अनेकांनी स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र कोणतीही माहिती अथवा घोषणा रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याचा दावा प्रवाशांनी केला.

रेल्वेचे स्पष्टीकरण..

पश्चिम रेल्वेने याविषयी स्पष्टीकरण देत कल्याण, जळगाव, भुसावळ,  खांडवा, इटारसी, जबलपूर, माणिकपूरमार्गे जाणाऱ्या या मार्गावर धावत असलेल्या श्रमिक गाडय़ांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी व्यस्त मार्गामुळे वसई ते गोरखपूर गाडीला बिलासपूर, राऊरतेला, आसनसोल मार्गे नेण्यात आल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश, बिहारकडे मोठय़ा संख्येने श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे भुसावळ, इटारसी, जबलपूर मार्गावर गाडय़ांची कोंडी झाली असून अनेक गाडय़ा एकामागोमाग उभ्याच राहात आहेत. या व्यस्त मार्गावरून गाडय़ा न जाता पश्चिम, मध्य आणि कोकण रेल्वेवरून सुटणाऱ्या श्रमिक रेल्वेगाडय़ांना बिलासपूर, राऊरकेला मार्गाचा पर्याय द्यावा लागत असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. वसई ते गोरखपूर रेल्वे गाडीचा प्रवास साधारण २५ ते २६ तासांचा आहे. मात्र दुसऱ्या मार्गावरून वळवल्याने याच प्रवासात साधारण १५ तासांची भर पडली आहे. हीच परिस्थिती मुंबईतून उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या अन्य गाडय़ांची आहे.

कामगारांचे हाल

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून श्रमिक गाडय़ा सुटताना सुरुवातीच्या स्थानकापासून खाण्यापिण्याची व्यवस्था राज्य सरकार करते. परंतु बहुतांश वेळा मुंबईतून सुटणाऱ्या सुरुवातीच्या गाडय़ांमध्ये प्रवासात राज्य सरकारकडून खानपान सुविधा दिलीच गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 12:33 am

Web Title: derailment of labor special trains abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दहा वर्षे सीईटी देणारे शशांक प्रभू यंदाही प्रथम
2 विमानसेवा सुरू करण्यास सरकार अनुत्सुक
3 राज्यात करोनाचे २,६०८ नवे रुग्ण
Just Now!
X