पाऊण महिन्याने विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असताना केवळ सभापतीपदाची निवड आणि विरोधी पक्षनेत्याच्या घोषणेची औपचारिकता पूर्ण करण्याकरिता उद्या एक दिवसाच्या विधान परिषदेच्या अधिवेशनामुळे सरकारच्या तिजोरीवर काही लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. हे सारे २ जूनलाही करणे शक्य होते, पण राजकीय सोय लावण्याकरिता हे सारे घडवून आणले जात आहे.
विधान परिषदेच्या सभापतीपदी शिवाजीराव देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. त्यानंतर सभापती व विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होईल. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असलेले देशमुख यांची सभापतीपदाची ही हॅटट्रिक आहे. विनोद तावडे यांच्याच नावावर भाजपने विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब केले.