एरवी इंधनाचे दर किंचित वाढले तरी त्यामुळे वाहतूकखर्च वाढल्याचे कारण देत जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करणारे व्यापारी आता मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. गेल्या पाच महिन्यांत डिझेलच्या दरात तब्बल २५ टक्क्य़ांनी घट झाली आहे. मात्र त्याचा थोडाही फायदा ग्राहकांना देण्याची दानत या व्यापारीबांधवांनी दाखविली नाही. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचे दर आजही तसेच चढे असून, सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेली महागाईही कायम आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत असंतोषाचे वातावरण असून, सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
नव्या दरकपातीनंतर डिझेल आता ५२.९९ रुपये लिटर या दराने मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी डिझेल वाहनांचा वापर होतो. डिझेलच्या दरकपातीचा परिणाम म्हणून वस्तू-सेवांच्या किमती खाली येणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी बैठक बोलवण्याची मागणीही, ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केली आहे.

तुलनेत महागाईतील उतार नरमच
डिसेंबर २०१४ पर्यंतचा घाऊक किंमत निर्देशांक शून्यानजीक असला तरी त्यातील उतार कमालीचा म्हणता येणार नाही. जूनपासून सातत्याने घसरत असलेल्या या दरांमध्ये ऐन वर्षअखेरीस भर पडली व त्याने पुन्हा शून्यातून डोके वर काढले. तर किरकोळ महागाईचा दर अद्यापही पाच टक्क्यांच्या वरच आहे.

जून २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर प्रति बॅरल ११५ डॉलर इतके होते. आता हा दर ५१ डॉलर प्रति बॅरल इतका खाली आला आहे. खनिज तेलाच्या दरातील ही घसरण सुमारे ६० टक्के आहे. ते पाहता भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती त्या प्रमाणात कमी झालेल्या नाहीत. भारतीय तेलकंपन्यांनी या दर कपातीचा निम्माच लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला आहे. याच काळात रुपयाची ताकद ८ टक्क्यांनी घटली, असेही आकडेवारी सांगते.