नोकरीच्या शोधात असलेल्या सुमारे तीन कोटी भारतीय तरुणांचे वैयक्तिक तपशील डार्कनेटवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने सायबर यंत्रणांनी चिंता व्यक्त केली. ही माहिती कोणी उपलब्ध केली यापेक्षा ही माहिती कोठून उपलब्ध झाली, याचा शोध सायबर यंत्रणा घेत आहेत.

सायबील या अमेरिकी कं पनीने गेल्याआठवडय़ात ही बाब भारतीय यंत्रणांच्या लक्षात आणून दिली. मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमधील दोन कोटी ९० लाख तरुणांचे नाव, पत्ता, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्र मांक आदी तपशील डार्कनेटवर उपलब्ध असल्याचा शोध सायबीलच्या तज्ज्ञांनी लावला. हॅकर्सनी इतका तपशील कोठून मिळवला किंवा चोरला याबाबत मात्र सायबीलचे तज्ञ ठाम निष्कर्षांवर आलेले नाहीत. मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या किंवा त्याबाबत माहिती देणाऱ्या दोन नामांकित संकेतस्थळांची नावे सायबीलने आपल्या अहवालात घेतली आहेत.

राज्याच्या सायबर विभागानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात भ्रमणध्वनी क्रमांक किवा ईमेल आयडी उपलब्ध होणे ही चिंतेची बाब असल्याचे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या तपशीलाचा वापर आर्थिक फसणुकीसाठी होऊ शकतो, असे त्याने सांगितले. ईटरनेट वापरकर्त्यांनी आपले पासवर्ड सतत बदलावे, कोणत्याही आमीषाला बळी पडू नये, अशी सचूना सायबर विभागाने केली आहे.