दोन किलो बनावट सोने हस्तगत

सतर्क सोनाराच्या मदतीने गुन्हे शाखेने बनावट सोने विकून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपीला अटक केली. या आरोपीकडून दोन किलो वजनाचे बनावट सोने हस्तगत करण्यात आले. ते सोने ही टोळी ४० लाख रुपयांना तक्रारदार सोनाराला विकणार होती.

दीपक शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तक्रादार सोनार काही दिवसांपुर्वी सोने खरेदीसाठी झवेरी बाजार येथे गेले होते. तेथे त्यांना शिंदे आणि त्याच्या साथीदाराने गाठले. ३० हजार रुपये प्रति तोळा या दराने दोन किलो सोने विकू, असे दोघांनी सोनाराला सांगितले. सौदा फायद्याचा असल्याने सोनाराने या व्यवहारात रस घेतला. खातरजमेसाठी आरोपींनी त्याला ५ तोळ्याची सोन्याची वळी दाखवली. ती अस्सल सोन्याची होती. त्यामुळे उर्वरित सोनेही अस्सलच असावे, असा सोनाराचा समज झाला. मात्र दोन किलो सोने विकत घेण्यासाठी आर्थिक तजवीज करावी लागेल, त्यासाठी वेळ लागेल, असे सोनाराने सांगताच आरोपींनी घाई करण्यास सुरूवात केली. २० हजार रुपये प्रति तोळा या दराने सोने देऊ, अशी गळ आरोपींनी घालताच सोनाराच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्याने गुन्हे शाखेच्या दहिसर कक्षाकडे तक्रार दिली. कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या पथकाने सापळा लावून  शिंदेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०० ग्रॅमची २० बनावट सोने बिस्कीटे हस्तगत करण्यात आली.