पनवेलच्या जाधव कुटुंबाची तक्रार

खासगी गुप्तहेर सतीश मांगलेच्या दबावामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली. त्याबाबत मांगलेविरोधात गुन्हा नोंदवा, अशी मागणी घेऊन खांदेश्वरच्या खांदा कॉलनीत राहणारे अंबादास जाधव ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे खेटे घालत आहेत. सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्याकडे खंडणी मागितल्याबद्दल मांगले अटकेत आहे.

जाधव यांचा मुलगा समीर (४०) एमएस्सी, डीआयएसी (डिप्लोपा इन इंडस्ट्रियल अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री) होता. रबाळे येथील खासगी कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी करत होता. याच कार्यालयात एक विवाहित तरुणी कार्यरत होती. समीरशी असलेली मैत्री घरी समजली आणि कुटुंबाने या तरुणीला घरी नजर कैद केले. या तरुणीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी समीरने मांगले आणि त्याच्या खासगी गुप्तहेर संस्थेची मदत घेतली. हे काम करण्यासाठी समीरने मांगलेला ४ लाख रुपये दिले. मात्र काम न करता मांगले आणखी पैसे मागू लागला. बदनामी करेन, नोकरी घालवेन, अशा धमक्या देऊ लागला. त्या दबावाने निराश झालेल्या समीरने ऑगस्ट २०१२मध्ये राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

समीरच्या मृत्यूनंतर पाठपुरावा केला, माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा समीर व मांगले यांच्यातील ई-मेलवरून झालेले संवाद हाती लागले. समीरने मांगलेची मदत का घेतली याबाबत माहिती मिळाली. समीरने आणखी पैसे द्यावेत यासाठी मांगले त्याच्यावर दबाव आणत होता, धमकावत होता, हेही समजले. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज करून मांगले व त्याच्या गुप्तहेर संस्थेविरोधात कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांनी तो अर्ज पुढील कारवाईसाठी कळंबोली पोलीस ठाण्यात धाडला. मात्र मांगलेवर कारवाई झाली नाही. अलीकडे त्याला अन्य गुन्ह्य़ात अटक झाल्याचे कळताच तक्रार अर्ज, गोळा केलेले पुरावे आणि माहिती घेऊन इथे आलो, असे जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

खंडणीविरोधी पथकाने जाधव यांच्या तक्रारीची माहिती घेतली. मात्र प्रकरण नवी मुंबईतील असल्याने स्थानिक पोलिसांकडे नव्याने तक्रार करण्यास सुचविण्यात आले. दरम्यान, कोठडीत असलेल्या मांगलेकडे अधिकाऱ्यांनी समीरबाबत चौकशी केली. समीरला ओळखतो, त्याचे काम करून देण्यासाठी ४ लाख रुपये घेतले होते, अशी कबुली मांगलेने त्यांना दिली. मांगले याने मोपलवार, जाधव यांच्याप्रमाणेच अनेकांकडे खंडणी मागितली असावी, फसवणूक केली असावी, असा अंदाज ठाणे पोलीस वर्तवतात.