राज्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ) आणि साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (एआरटीओ) रिक्त जागांमुळे आरटीओतील कामांचा खोळंबा होत आहे. उपप्रादेशिक पदाची ५५ पैकी ११ पदे आणि साहाय्यक प्रादेशिकची १०० पदांपैकी ५० पदे रिक्त आहेत. यामुळे उपप्रादेशिक अधिकारी पदावर पदोन्नतीही रखडल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात १५ ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ अधिकारी) यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीही कार्यरत आहेत. तर काही जिल्ह्य़ांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी ही फक्त उपप्रादेशिक अधिकारी आणि साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरच आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हा त्या-त्या जिल्ह्य़ातील आरटीओ कार्यालयाचा प्रमुख असतो. तर या पदाखाली साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी येतात. वाहन नोंदणी, लायसन्स (अनुज्ञप्ती), परवाना, वाहन कर यासह अनेक कामे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होत असतात.

मात्र मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि अन्य काही भागांत अनेक जिल्ह्य़ांत उपप्रादेशिक परिवहन आणि साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीच नाही. एका जिल्ह्य़ाच्या अधिकाऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्य़ाचा कार्यभार आहे. पद न भरल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नतीही रखडली आहे. याकरिता ३० मे २०१९ ला पदोन्नती समितीची बैठकही झाली. पात्र अधिकाऱ्यांच्या नावाची यादी अंतिम मान्यतेकरिता सामान्य प्रशासन विभागाकडेही पाठवली. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीपूर्वी सेवाज्येष्ठता यादी सामान्य प्रशासन विभागाने मान्य केली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब या अनेक कारणांमुळे रिक्त पद भरणे व पदोन्नती रखडल्या. आता यासंदर्भातील प्रस्ताव परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विभागाकडे गेल्या दोन महिन्यांपासून आहे. तरीही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पदोन्नती समितीची बैठक होऊन एक वर्षांचा कालावधी उलटूनही पदोन्नती आदेश निघालेले नाही. त्यामुळे आरटीओतील कामे रखडत आहेत.

यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कुठे किती पदे रिक्त?

ताडदेव आरटीओत साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या चारपैकी तीन जागा रिक्त, वडाळा पाचपैकी दोन, बोरिवलीत तीनपैकी दोन, ठाणे आरटीओत पाचपैकी दोन, कल्याण आणि पेण आरटीओतील एकमेव पद रिक्त आहे. पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य कार्यालयांतही अशीच परिस्थिती आहे. तसेच अंधेरी, वडाळा, नागपूर ग्रामीण, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, पिंपरी-चिंचवड, आंबेजोगाई, कराड आरटीओत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची ११ पदे रिक्त आहेत.