व्हिवा लाउंजमध्ये मुक्त संवाद साधण्याची रसिकांना संधी
शास्त्रीय आणि सुगम गायनाच्या क्षेत्रात रसिक मान्यता मिळवतानाच पाश्र्वगायिका म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रतिभावंत गायिका देवकी पंडित यांच्याबरोबर शब्दमैफल आज, मंगळवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात रंगणार आहे. केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर देवकीताई येणार असून त्यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळेल.
गेल्या तीन दशकांपासून देवकीताई संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. आई उषा पंडित यांच्याकडून गायनाचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यानंतर लहानपणीच पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडून देवकीताईंनी संगीताचे धडे घेतले. गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे दिग्गज गुरू पुढे देवकीताईंना लाभले. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. त्याच वेळी पाश्र्वगायिका म्हणूनही त्या सामान्य श्रोत्यांना तृप्त करत होत्या.
‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून ‘देवकीस्वर’ घराघरात पोचले. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले.
परखड परीक्षक
काही वर्षांपूर्वी ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या परखड परीक्षक म्हणून देवकीताईंमधल्या जागरूक, गुणग्राहक गुरूंची प्रेक्षकांना ओळख झाली. सुरांच्या काटेकोरपणाबद्दल आग्रही असणारी ही गायिका तेव्हा या भूमिकेतही प्रेक्षकांना भावली.
तरुणाईचे संगीत, त्यांचे कलाभान, संगीतक्षेत्रात काम करतानाची पथ्ये, अनुभव या सगळ्यांबद्दल देवकीताईंशी व्हिवा लाउंजच्या माध्यमातून संवाद साधता येईल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

कधी : आज
वेळ : सायंकाळी ६ वाजता
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई.
(प्रवेश विनामूल्य, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.)