वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी व्यासपीठावर गाणे गाऊन श्रोत्यांच्या ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. सुरांच्या काटेकोरपणाबद्दलचा त्यांचा आग्रह, परखडपणा हे त्यांचे वैशिष्टय़ असूनही सामान्य रसिकांच्या मनात स्थान मिळविणारे हे नाव.
शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीतांमुळे घराघरांत पोहोचलेल्या प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी येत्या मंगळवारी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून मिळणार आहे.
केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजमधून विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी करणाऱ्या कर्तबगार स्त्रियांच्या गौरवगाथा मांडण्याचा प्रयत्न असतो. या वेळी देवकी पंडित यांच्या रूपाने हरहुन्नरी गायिकेची शब्दमैफल रंगणार आहे. गेल्या तीन दशकांपासून देवकीताई संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून ‘देवकीस्वर’ घराघरांत पोचले.
‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकीताईंमधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. अशा गायिकेबरोबर थेट संवादाचा हा कार्यक्रम येत्या मंगळवारी दादर येथे होणार आहे.

’कधी : मंगळवार, २९ सप्टेंबर
’वेळ : सायंकाळी ६ वाजता
’कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई.
’प्रवेश विनामूल्य, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.