‘लोकसत्ता’ व्हिवा लाऊंजमध्ये देवकी पंडित यांची शब्दमैफल रंगली
एखाद्या गायकाच्या संगीतमैफलीप्रमाणेच त्याची शब्दमैफलही कशी आणि किती रंगू शकते, याचा प्रत्यय मंगळवारी दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात रसिक श्रोत्यांना आला. निमित्त होते केसरी प्रस्तुत व ‘दिशा डायरेक्ट’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता’ व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात झालेल्या प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या शब्दसंवादाचे..
कामाच्या दैनंदिन व्यापात संगीत कलेसाठी फक्त एक तास देता येतो. तेवढा वेळ पुरेसा आहे का, या एका श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नावर देवकी पंडित यांनी संगीताच्या साधनेत तास नव्हे तर ध्यास महत्त्वाचा आहे. गाण्यात स्वत:ला झोकून दिल्याशिवाय आणि संपूर्ण विसरल्याशिवाय कलावंत होता येत नाही. कलेच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या झगमगाटापासून कलावंताने स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. ग्लॅमर आणि ‘फेसव्हॅल्यू’ या वरवरच्या गोष्टी असून रियाज, साधना आणि गुरू ही संगीताची खरी त्रिसूत्री आहे. या तीन गोष्टींशिवाय संगीतात प्रगती करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन केले.
‘मला गाणे येते’ या भूमिकेतून बाहेर पडा. गाण्यासाठी श्वास आणि आवाज यांची मैत्री झाली पाहिजे. श्वास, आवाज आणि मन यांचा खूप मोठा संबंध आहे. आवाजाची कंठतयारी करणेही महत्त्वाचे आहे. अभिजात संगीतात जी श्रीमंती आहे ती कुठेच नाही. त्यामुळे नवीन मुलांनी सर्वव्यापी श्रुतींचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे. गाण्यात प्रभुत्व मिळवायचे असेल तर गाण्याच्या मागे लागले पाहिजे, असा सल्लाही दिला.
मुलांनी ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये काम करण्यापूर्वी संगीत कलेचा रीतसर आणि चोख अभ्यास करणे गरजेचे आहे. तो केल्याशिवाय दूरचित्रवाहिन्यांवरील लोकप्रिय कार्यक्रमांत सहभागी होणे योग्य ठरणार नाही. ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये आपल्या मुलांना पाठविणे हा पालकांचा निर्णय असतो हे जरी खरे असले तरी अपुऱ्या ज्ञानावर अशा कार्यक्रमांत सहभागी होणे योग्य ठरणार नाही. मी माझ्या मुलांना अशा कार्यक्रमात पाठवले नसते, असे त्यांनी सांगताच तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
आई उषा पंडित हिच्याकडून गिरविलेले संगीताचे धडे. आपले गुरू पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच गुरू म्हणून त्यांनी केलेल्या संस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सुमारे दोन तास रंगलेल्या या शब्दमैफलीची भैरवी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘सुंदर भूमी मंगल भूमी’ आणि ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या गाण्यांनी झाली तेव्हा उपस्थितांनी उभे राहून देवकी पंडित यांना मानवंदना दिली. ‘केसरी’चे केसरीभाऊ पाटील यांच्या हस्ते देवकी पंडित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

‘देवकी’ सल्ला
अभिजात संगीतात जी श्रीमंती आहे ती कुठेच नाही. त्यामुळे नवीन मुलांनी सर्वव्यापी श्रुतींचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे.

गाण्यात झोकून दिल्याशिवाय व स्वत:ला संपूर्ण विसरल्याशिवाय कलावंत होता येत नाही. कलेच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या झगमगाटापासून कलावंताने स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.