महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावीत. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कृषी विद्यापीठाना दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा करताना या सूचना दिल्या.

शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करतांना  विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे.

विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे विकेल ते पिकेल ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठांनी विविध वाणांचे संशोधन करतांना शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लहान यंत्रांचे संशोधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

तर कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम हा बदलत्या काळाशी सुसंगत असावा, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले.