बाजारात ठाण मांडून असलेली मंदी, जागांच्या वाढत्या किमती आणि विविध करांमुळे शहरात अशक्य ठरलेले स्वस्त घरांचे ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ठाणे परिसरातील विकासकांनी भिवंडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचेच प्रतिबिंब यंदा ‘एमसीएचआय’च्या प्रदर्शनातही उमटणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एमसीएचआय- क्रीडाय’चे मालमत्ता प्रदर्शन १७ ते २० जानेवारीदरम्यान हायलँण्ड गार्डन, ढोकाळी रोड, कोलशेतजवळ, कापूरबावडी जंक्शन, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील या सर्वात मोठय़ा मालमत्ता प्रदर्शनात यंदा ४० हून अधिक विकासकांचे तीनशेपेक्षा जास्त गृहप्रकल्पांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे २० हून अधिक बँका तसेच वित्तीय पुरवठा संस्था या प्रदर्शनात सहभागी होऊन घरांसाठी कर्जे उपलब्ध करून देणार आहेत.
अनेक जण घरांच्या किमती कमी होण्याची वाट पाहत असल्याने गृहविक्री काहीशी मंदावली असल्याचे ‘एमसीएचआय-क्रीडाय’-ठाणेचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी मान्य केले. मात्र जागांच्या वाढत्या किमती आणि वाढलेल्या विविध करांमुळे आता यापेक्षा कमी किमतीत घरे विकणे बांधकाम व्यावसायिकांना शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळेच यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात भिवंडीतल्या गृहप्रकल्पांसाठी स्वतंत्र दालन राखीव ठेवून ‘एमसीएचआय’ने अप्रत्यक्षरीत्या किफायतशीर घरे आता ठाण्याबाहेरच उपलब्ध होऊ शकतात, हेच अप्रत्यक्षरीत्या सुचविले आहे. ठाणे महापालिका आणि राज्य शासन खाडीपल्याड नवे ठाणे वसविण्याच्या प्रयत्नात आहे. तशी घोषणाही तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव यांनी केली होती. ते नवे ठाणे प्रत्यक्षात वसेल की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी कनिष्ठ मध्यमवर्गीय ठाणेकरांना आता घरांसाठी भिवंडीलाच जावे लागेल. बायपास मार्गामुळे भिवंडी आता ठाण्याच्या अधिक जवळ आले आहे. तसेच दिवा-वसई रेल्वेमार्गावरील गाडय़ांच्या वाढत्या फेऱ्यांमुळेही भिवंडी परिसरातील खारबावसारख्या विभागात मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. आताही ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठे गृहप्रकल्प घोडबंदर रोड तसेच शीळ विभागात आहेत. नवा उड्डाण पूल कार्यान्वित झाल्याने आता कापूरबावडी जंक्शनची वाहतूक समस्या संपली आहे. त्यामुळे घोडबंदरहून ठाण्यात ये-जा करणे आता अधिक सोयीचे झाले आहे.