निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आलेले निर्बंध व मजुरांमधील अस्वस्थता यामुळे गृहप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडणारे विकासक घरांची विक्री मंदावल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे निर्माण होणारी रोकडटंचाई आणि वित्तीय संस्थांडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींच्या कात्रीत विकासक सापडले आहेत.

निर्बंध आणखी वाढल्यामुळे आता उपलब्ध असणारे मजूरही गावी परतण्याच्या तयारीत असल्याचा फटका बांधकाम व्यवसायाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला. एप्रिल ते सप्टेंबपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. ७० ते ८० टक्के मजूर आपल्या गावी निघून गेल्यामुळे विकासकांना प्रत्यक्ष बांधकाम सुरू करता आले नव्हते. बांधकाम नियमितपणे सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडला. आताही मार्चपर्यंत या व्यवसायाने जोर धरला होता. राज्य शासनानेही मुद्रांक शुल्कात कपात केल्याने घरांची विक्रीही झाली. त्यामुळे विकासकांकडेही रोकड उपलब्ध झाली. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेत टाळेबंदी लागू झाली तशी मजुरांमध्ये चलबिचल सुरू झाली.

कुशल मजूर हे बाहेरूनच मागवावे लागतात आणि तसे करण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे बांधकाम सुरू राहण्यात अडचणीच येणार आहेत, असे अनेक विकासकांचे  म्हणणे आहे.

करोनाच्या पहिला लाटेचा अनुभव असल्यामुळे आता दुसऱ्या लाटेत बांधकाम सुरू ठेवण्यासाठी काय करायचे याची विकासकांना कल्पना आहे. त्यामुळे या लाटेमुळे बांधकाम ठप्प होण्याची शक्यता कमी आहे

– डॉ. निरंजन हिरानंदानी, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)

* करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत एप्रिल २०२० मध्ये फक्त २७ दस्तावेज नोंदले गेले होते.

* यंदा एप्रिलअखेपर्यंत दहा हजार १३६ दस्तावेजांची नोंद झाली. यापैेकी अनेक दस्तावेज हे मुद्रांक कपातीचा फायदा उठविलेले व नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेले होते. त्यामुळे प्रत्यक्षात घरांची विक्री मंदावल्याचा दावा केला जात आहे.