News Flash

वर्षभरात मुंबईतील २४ ‘मियावाकी’ वनांना बहर

दीड लाखांहून अधिक झाडांमुळे हरितपट्टय़ाचा विकास

दीड लाखांहून अधिक झाडांमुळे हरितपट्टय़ाचा विकास

मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, वृक्षवल्लींचे जतन व्हावे आणि छोटी वने विकसित व्हावीत या उद्देशाने मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी ‘मियावाकी’ वनांसाठी रोप लागवड केली होती. सुमारे ६४ पैकी २४ ठिकाणच्या वनांमधील दीड लाखांहून अधिक झाडे बहरली असून भविष्यात त्यांचे रुपांतर हरितपट्टय़ात रूपांतर होण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागली आहे. त्याचबरोबर मुंबईतील हरित पट्टय़ांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेत पालिकेने जपानी पद्धतीच्या ‘मियावाकी’ तंत्राच्या आधारे मुंबईत वृक्ष लागवड करण्याचा निर्णय गेल्या घेतला होता. ‘मियावाकी’ पद्धतीमध्ये कमी जागेत अधिक झाडांची लागवड करण्यात येते. गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘मियावाकी’ उद्यानांच्या प्रकल्पाला सुरुवात केली होती. गेल्या वर्षभरात मुंबईतील ६४ ठिकाणी ‘मियावाकी’ उद्यानांसाठी वृक्षलागवड करण्यात आली आहे. यापैकी २४ ठिकाणच्या उद्यानांमधील वृक्ष बहरू लागले आहेत. या उद्यानांमध्ये ४७ हून अधिक प्रकारची एक लाख ६२ हजार ३९८ झाडांची लागवड करण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे आदींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडुनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. अवघ्या वर्षभरातच या झाडांनी चार ते पाच फूट उंची गाठली आहे, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी ‘मियावाकी’ वने ही कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरसारख्या शहरांमधील ‘शहरी वनां’च्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहेत. मुंबईतील अन्य ४० ठिकाणच्या ‘मियावाकी’ वनांची कामे प्रगतिपथावर आहेत. विशेष म्हणजे आकारास आलेल्या २४ मियावाकी वनांपैकी ४ वने ही ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’तून खाजगी संस्थांच्या सहकार्याने फुललेली आहेत.

बहरलेल्या वनांपैकी पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागातील ‘आयमॅक्स’ थिएटरजवळच्या भक्ती पार्क उद्यानातील भूखंडावर सर्वाधिक म्हणजे तब्बल ३६ हजार ४८४ एवढी झाडे लावण्यात आली आहेत. या खालोखाल ‘एल’ विभागातील एका भूखंडावर २१ हजार ५२४ झाडे, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड पश्चिम परिसरातील मनोरी गावालगतच्या एका भूखंडावर १८,२०० झाडे आहेत. या तीन ‘मियावाकी’ वनांव्यतिरिक्त अन्य ठिकाणची २१ ‘मियावाकी’ वने आता आकारास आली आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:29 am

Web Title: development of green belt due to more than one and half lakh trees zws 70
Next Stories
1 शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन!
2 हुतात्म्यांच्या वारसांना तातडीने वीजजोडणी
3 एकनाथ खडसे आरोपी नाहीत, केवळ चौकशीसाठी बोलावले -ईडी
Just Now!
X