X

विकास आराखडा कागदावरून प्रत्यक्षात

सरकारच्या मंजुरीपूर्वीच आरक्षित जागांचा विकास

सरकारच्या मंजुरीपूर्वीच आरक्षित जागांचा विकास

सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली नसली तरी प्रशासनाने आधीच्या आराखडय़ात नमूद असलेल्या आरक्षणानुसार काही जागांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार वर्षभरात ४१ उद्यानांसह १७ अग्निशमन केंद्रे, २७ कचरा वर्गीकरण व प्रक्रिया केंद्रे, चार मंडया, १२ पालिका शाळा, ८ दवाखाने याचप्रमाणे गोरेगाव येथे महिलांसाठी बहुउद्देशीय गृह व बेघरांसाठी चार निवारा घरे उभारण्यात येतील. यातील बहुतांश सुधारणा पूर्व व पश्चिम उपनगरांत होणार आहेत.

शहराच्या आगामी २० वर्षांच्या विकासाचा आराखडा २०१४ मध्येच लागू होणे अपेक्षित होते. मात्र तीन वर्षे उलटून गेल्यावरही सुधारित प्रारूप आराखडय़ालाही अंतिम मंजुरी मिळालेली नाही. आधीच्या आराखडय़ांमधील नोंदींची फारच कमी प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे या वेळी विकास आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी पंचवार्षिक टप्पे आखण्यात येणार असून दरवर्षी अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाईल. या वेळी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात २,०९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून १९६७ आणि १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखडय़ातील आरक्षित असलेल्या व या वेळच्या विकास आराखडय़ात कोणतेही बदल न केलेल्या जागा विकसित करण्याचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे.

यासंदर्भात शनिवारी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. ४१ भूखंडांवर २५ उद्याने व १६ क्रिडांगणे करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक आठ भूखंड बोरीवलीमध्ये आहेत. दक्षिण मुंबईत तीन, पश्चिम उपनगरात २२ उद्याने व पूर्व उपनगरांमध्ये १६ उद्यानांचा विकास अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे १२ भूखंडांवर महानगरपालिकेने स्वतच्या शाळा बांधायचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षे प्रलंबित असलेली अग्निशमन केंद्रे या वर्षी प्रत्यक्षात आणण्याचा पालिकेचा मानस आहे. यात प्रियदर्शिनी पार्क येथील अग्निशमन केंद्राचाही समावेश आहे. पालिकेने काही निवडक उपनगरे वगळता इतर सर्व ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्रे व प्रक्रिया केंद्रांसाठी जागा वापरता येतील.  गोरेगावमध्ये महिलांसाठी बहुद्देशीय गृहकेंद्र उभारण्यात येणार आहे. चार ठिकाणी बेघर निवारा केंद्रे उभारली जातील.

विकास आराखडय़ाची अंमलबजावणी

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain