शिवसेनेला फेररचनेचा आणि आरक्षणाचा फटका; पक्षासमोर अनेक आव्हाने

युतीबाबतची अनिश्चितता, सत्ताधारी म्हणून रस्ते, नालेसफाई घोटाळ्यांकरिता विरोधकांकडून केले जाणारे लक्ष्य, मराठा मूक मोर्चावरील व्यंगचित्रावरून झालेली कोंडी अशी एक ना अनेक आव्हाने शिवसेनेसमोर उभी ठाकली आहेत. त्यातच ७६ नगरसेवकांची फौज असलेल्या पालिकेतील या सर्वात मोठय़ा पक्षाला प्रभाग फेररचनेचा आणि आरक्षणाचा फटका बसणार आहे. एका प्रभागाचे दोन, तीन प्रभागांमध्ये विभाजन झाल्याने गेल्या पाच वर्षांमध्ये नगरसेवक निधीची पेरणी करीत केलेली विकासकामे नगरसेवकांच्या किती कामाला येतील, असा प्रश्न शिवसेना नगरसेवकांसमोर ठाकला आहे.

मुंबई महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ७५ उमेदवार विजयी होऊन पालिकेत दाखल झाले. त्यानंतर चेंबूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांच्या फौजेमध्ये आणखी एका नगरसेवकाची भर पडली. त्यामुळे पालिकेमध्ये शिवसेनेचे ७६ नगरसेवक असून नऊ अपक्ष, भारिप बहुजन महासंघ व रिपाइं (ए) यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण ११ नगरसेवकांच्या पाठींब्यामुळे पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ ८९ वर पोहोचले आणि पालिकेतील सत्ता स्थापनेत शिवसेनेला पुन्हा एकदा यश मिळविले. मात्र, सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आगामी निवडणुकीत पालिकेतील संख्याबळ कायम ठेवण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, नगरसेवक श्रीकांत कवठणकर, अजित भंडारी, प्रशांत कदम, राजू पाध्ये, राजू पेडणेकर, अनंत नर, अनिल त्रिंबककर, दीपक भूतकर, शांताराम पाटील, अरुण दुधवडकर, अनिल सिंह, सुरेंद्र बागलकर, अरुण दुधवडकर, संपत ठाकूर, गणेश सानप आदींचे प्रभाग फेररचनेत अन्य प्रभागांमध्ये विखुरले गेले आहे, तसेच काहींचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. मातब्बरांच्या पंगतीत मान मिळविणाऱ्या यशोधर फणसे यांना मात्र आसपासच्या दोन प्रभागांमधून निवडणूक लढविण्याची संधी आहे. त्याशिवाय अन्य काही मंडळींनाही तशी संधी आहे. परंतु सुरेंद्र बागलकर, अरुण दुधवडकर, गणेश सानप, संपत ठाकूर, अनिल सिंह या सर्वाचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. या मंडळींच्या प्रभागाच्या आसपास खुल्या प्रभागाची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील प्रभागातून उमेदवारी मिळविण्यासाठी या मंडळींना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. उमेदवारी मिळालीच, तर बदलेल्या प्रभागातील नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या मंडळींना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

आरक्षणाची सोडत महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि शुभा राऊळ यांच्या पथ्यावर पडली आहे. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक १९८, १९५ व २०० (अनु. जाती महिला) राखीव आहेत. त्यामुळे यापैकी एका प्रभागातून स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी मिळू शकेल. शुभा राऊळ आणि श्रद्धा जाधव, त्याचबरोबर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, किशोरी पेडणेकर, यामिनी जाधव आदींना आसपासच्या प्रभागांमधून संधी मिळणार आहे. चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषविलेले राहुल शेवाळे आणि सभागृह नेते, महापौर पदाची धूरा सांभाळलेले सुनील प्रभू हे द्वयी शिवसेनेचे पालिकेतील मुख्य मोहरे होते. परंतु राहुल शेवाळे खासदार, तर सुनील प्रभू आमदार झाल्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या रिंगणातून ते दूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता पालिकेतील नेतृत्वासाठी खमक्या नगरसेवकांची गरज आहे. त्यासाठी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अथवा आरक्षणाचा फटका बसल्यामुळे घरी बसण्याची वेळ आलेल्या मंडळींची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आहे.