बदलते आराखडे, कामातील दिरंगाई, निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबईतील पर्यटनाचे महत्त्वाचे स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई उद्यान अर्थात राणीच्या बागेचे नूतनीकरण पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. या बागेत अलीकडेच दाखल झालेल्या पेंग्विनचे दर्शन नोव्हेंबरपासून खुले करण्याचा व्यवस्थापनाचा दावा असला तरी प्रत्यक्ष प्राणिसंग्रहालयाचे काम अद्याप बरेच बाकी आहे. वारंवार बदलणारे आराखडे, वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेल्या कामात होत असलेला विलंब आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील कामाचे आदेश देण्यात येणारे अडथळे अशा कारणांमुळे राणीच्या बागेचे नूतनीकरण रखडत सुरू आहे.

राणीच्या बागेच्या नूतनीकरणासाठी पाच वर्षांपूर्वी १५० कोटी रुपयांच्या आराखडय़ाला मान्यता मिळाली होती. २०११ मधील आराखडय़ानुसार हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुळात कामाची सुरुवात होण्यास २०१४ उजाडले. या कामाचे तीन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात रिकाम्या जागेत पिंजरे बांधणे, दुसऱ्या टप्प्यात प्राणी आणणे व तिसऱ्या टप्प्यात आधीच्या पिंजऱ्यांच्या जागी नवीन पिंजरे बांधायचे आहेत. मात्र मुळात पहिला टप्पाच पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत उद्यानातील पुरातन वस्तूंचे जतनाचे काम, प्रशासकीय इमारतीची बांधणी पूर्ण झाली आहे. तसेच प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. प्रशासकीय इमारतीमधील पेंग्विनचे घर बांधण्याचे काम हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होते. मात्र वारंवार मुदत वाढवूनही हे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता या कंपनीला १५ नोव्हेंबरची मर्यादा देण्यात आली असून पेंग्विनच्या पिंजऱ्याचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या या कंपनीकडून समुद्री जीवांसाठी मत्स्यालय बांधण्याचे कंत्राटही काढून घेण्याचा विचार आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्याच्या आराखडय़ानुसार या प्राणिसंग्रहालयामध्ये तरस, कोल्हा, लांडगा, देशी अस्वल, रान कुत्रे, गवा, साळिंदर, माऊस डिअर, बारािशगा, सांबर, सामान्य पाणमांजर, आशियाई सिंह, बंगाली वाघ, लेपर्ड कॅट, रानमांजर, सामान्य उदमांजर, पाम उदमांजर, भारतीय उदमांजर हे १८ भारतीय प्राणी आणि इमू, पाणघोडा, जग्वार, झेब्रा व हम्बोल्ट पेंग्विन हे पाच विदेशी प्राणी ठेवण्यात येणार आहेत. त्याबरोबरच सध्या प्राणिसंग्रहालयामध्ये अस्तित्वात असलेले प्राणी-पक्षीदेखील प्रदर्शित करण्यात येतील. या प्राण्यांसाठी देश तसेच विदेशातून पिंजरे आणण्याचे काम सुरू आहे. पिंजरे व हे प्राणी पुढील वर्षभरात आणले जातील, असे सहायक आयुक्त सुधीर नाईक म्हणाले.

हा आराखडा १५० कोटी रुपयांचा असला तरी प्रत्यक्षात वेगवेगळ्या कामांसाठी काढलेली वेगवेगळी कंत्राटे व कामाला झालेला विलंब यामुळे प्राणिसंग्रहालयाचा खर्च आता ३०० कोटी रुपयांपलीकडे जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाटणकर मार्गानजीक उद्यानाच्या आत बांधलेल्या भिंतीवर आक्षेप असल्याने त्याही आता पाडल्या जातील. मुळात आवश्यकता नसलेल्या कामांवरील खर्च वाया जाणार आहे.