19 January 2019

News Flash

…अन्यथा फडणवीस उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल – उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना दिला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात कशी प्रगती झाली, कृषी उत्पादनाचा टक्का कसा वाढला, शेतकरी कर्जमाफीची शतप्रतिशत अंमलबजावणी एका ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कशी आहे या गोष्टी जोर देऊन सांगत असतात. हे बिनआवाजाचे ढोल त्यांनी जरूर पिटावे, मात्र कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

त्यांनी शेतमालाच्या कोसळणाऱ्या दरांवरुन देवेंद्र फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. शेतमालाचे कोसळलेले दर तसेच उत्पादन खर्चही मिळत नसल्याने मागच्या काही दिवसात काही शेतकऱ्यांनी पिके स्वत:च नष्ट केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. गडगडणारे भाव आणि ‘कोसळणारा’ शेतकरी यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल! असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

– राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात कशी प्रगती झाली, कृषी उत्पादनाचा टक्का कसा वाढला, शेतकरी कर्जमाफीची शतप्रतिशत अंमलबजावणी एका ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कशी आहे या गोष्टी जोर देऊन सांगत असतात. हे बिनआवाजाचे ढोल त्यांनी जरूर पिटावे, मात्र कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे. हे गडगडणारे भाव आणि ‘कोसळणारा’ शेतकरी यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल!

– सध्या देशभरातच एक प्रकारची अस्वस्थता आहे, अशांतता आहे. ही अशांतता वादळापूर्वीची आहे का हे भविष्यातच समजेल, पण महाराष्ट्रातील बळीराजाच्या अस्वस्थतेचे मात्र आता स्फोट होऊ लागले आहेत. फडणवीस सरकार म्हणते त्याप्रमाणे कर्जमाफीची ‘अंमलबजावणी’ होऊनही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे तडाखे बसत आहेत. गेल्या आठवड्य़ात अवकाळीने पिकांची नासाडी केली. रविवारी विदर्भ-मराठवाड्य़ाला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसला. वीज कोसळून यवतमाळ, सोलापूर आणि किल्लारी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात कांद्यापासून साखर आणि शेतमालापर्यंत अनेक पिकांचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्य़ात त्याच वैफल्यातून काही शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर भाजीपाला फेकून आपला संताप व्यक्त केला होता. नगर जिल्ह्य़ातील नितीन गवारे या तरुण शेतकऱ्याने शेतमालाचे दर कोसळले म्हणून वाजंत्री लावून उभ्या पिकात मेंढ्य़ा सोडल्या आणि संपूर्ण भाजीपाला स्वतःच नष्ट केला. गवारे यांनी कोबी, फ्लॉवर, टमाटा असा भाजीपाला शेतात घेतला होता. मात्र बाजारभाव कोसळल्याने त्यांना तो कवडीमोल दराने विकावा लागला. उत्पादन खर्चही हातात मिळत नसल्याने वैतागून त्यांनी स्वतःच मेंढ्य़ांचा कळप वाजतगाजत शेतात सोडला आणि टमाट्य़ाचे उभे पीक नष्ट करून टाकले. नितीन गवारे यांनी जे केले ते अनेकांना पटणार नाही. उभे पीक स्वतःच जनावरांच्या तोंडात घालणे किंवा रस्त्यावर फेकणे तर्कसंगत वाटणार नाही.

– मात्र जो शेतकरी कर्जाचे ओझे, अस्मानी-सुलतानीचे तडाखे सहन करीत, काबाडकष्ट करून पीक काढतो, त्याच्यावर आपल्याच हाताने ते फेकण्याची, मेंढ्य़ांना खाऊ घालण्याची वेळ का आणि कोणामुळे आली याचा विचार कोणी करायचा? शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक एकतर लहरी निसर्ग हिरावून घेतो नाही तर शेतमालाचे दर पाडून बळीराजाची झोळी फाटकीच कशी राहील हे पाहिले जाते. केंद्र आणि राज्यातील सरकारांचे हमीभावाचे आश्वासन फोल ठरल्यानेच सामान्य शेतकऱ्यांची अशी परवड होत आहे. ना त्याला कर्जमाफीचा लाभ झाला आहे ना त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळत आहे. हमीभाव किंवा रास्त भाव सोडा, निदान उत्पादन खर्चाइतका दर तरी शेतमालाला मिळायला हवा, पण तोदेखील मिळत नसेल तर पीक रस्त्यावर फेकण्याशिवाय किंवा उभ्या शेतात मेंढ्य़ा घुसविण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय शेतकऱ्याला राहतो? म्हणजे नापिकीमुळेही नुकसान आणि बंपर पीक आले तरी नुकसानच. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारे सध्या सत्तेत आहेत. तरीही परिस्थिती तीच आहे. टमाट्य़ाला भाव नाही, कांद्याचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खूप झाल्याने रब्बी कांद्याचे भाव पडल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी ही वेळ तूरडाळ उत्पादकांवर आली होती. सध्या हरभरा उत्पादक शेतकरीही जास्त उत्पादनाच्या ‘चरकात’ पिळला जात आहे.

– त्यात सरकारच्या हरभरा खरेदी योजनेचा नेहमीप्रमाणे बोजवारा उडाला आहे. तिकडे साखरदेखील या वेळी साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रडवणार अशी भीती आहे. ऊस लागवड आणि उत्पादन वाढल्याने साखर उत्पादन ४५ टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त झाला आणि लगेच साखरेचे भाव गडगडले. त्याचा परिणाम जसा साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होणार आहे तसा ऊस उत्पादकांवरदेखील होईलच. निर्यात बंदीचे लांबलेले निर्णय हेदेखील साखरेचे दर कोसळण्यामागे एक कारण असल्याचे सांगितले जाते. कांदा असो की ऊस, दरवर्षी त्याच्या दराचा प्रश्न पेटतोच. साखर कारखान्यांचे ‘बॉयलर प्रदीपन’ होण्याआधी ऊस रस्त्यावर पेटतो. या वेळी तडजोडीनुसार ‘एफआरपी अधिक २००’ रुपये अशी दरनिश्चिती झाली असली तरी साखरेचे दर गडगडल्याने उसाला हा भाव देणेही साखर कारखान्यांना अशक्य होईल असे सांगण्यात येते. थोडक्यात, साखरेच्या कोसळलेल्या दरांची कुऱ्हाड ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याच पायावर पडू शकते. राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात कशी प्रगती झाली, कृषी उत्पादनाचा टक्का कसा वाढला, शेतकरी कर्जमाफीची शतप्रतिशत अंमलबजावणी एका ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कशी आहे या गोष्टी जोर देऊन सांगत असतात. हे बिनआवाजाचे ढोल त्यांनी जरूर पिटावे, मात्र कांदा, टमाटा, साखर आणि इतर शेतमालाच्या घसरलेल्या भावांकडेही जरा लक्ष द्यावे. हे गडगडणारे भाव आणि ‘कोसळणारा’ शेतकरी यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा उद्या कोसळणारे तुमचे सरकार सावरणे मुश्किल होईल!

First Published on April 17, 2018 7:05 am

Web Title: devendara fadanvis uddhav thackray shivsena sammna