महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत CAA च्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकावर निशाणा साधला. तुम्ही आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखू शकता, आम्हाला परवानग्या नाकारु शकता मात्र CAA चं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात CAA च्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्याआधी रॅलीही काढण्यात आली. याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘CAA के सन्मानमें मुंबईकर मैदानमें’  अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

आम्ही शांतपणे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगीही आम्हाला नाकारण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल तर मला टिळकांनी जो प्रश्न विचारला तो विचारावाच लागेल की या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही फडणवीस म्हणाले. तुमचं राजकारण संकुचित आहे, खुर्चीचा मोह तुम्हाला आहे त्याच राजकारणातून तुम्ही CAA विरोधात भूमिका घेत आहात आणि देश पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप फडणवीस यांनी केला.

कुठल्याही धर्माच्या लोकांना आपल्या देशात जागा देऊन, त्यांच्या धर्माचा सन्मान करणारा भारत हा एकमेव देश आहे याचा तुम्हाला पडला का? असाही प्रश्न फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला. पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पंडित नेहरुंनी देशाला शब्द दिला होता, तो नरेंद्र मोदी यांनी पाळला. या गोष्टीचाही विसर विरोध करणाऱ्यांना पडला आहे असाही आरोप फडणवीस यांनी केली.