एका विकासकाला सवलत देण्यासाठी ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय’ असा शेरा लिहिल्यानेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे अडचणीत आले आहेत. या शेऱ्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आपली नाराजी विधानसभेत लपविता आली नव्हती. मेहता यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतर्गत विकासकाने जादा सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. शासकीय अधिकाऱ्यांनी उचित निर्णयासाठी हे प्रकरण सरकारकडे पाठविले होते. विकासकाला झुकते माप देण्याकरिताच मेहता यांनी फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय, असा शेरा लिहिला होता. या साऱ्या गैरव्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती होती, असा संशय मेहता यांच्या कृतीतून निर्माण झाला. यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी चर्चेच्या वेळी सारे प्रकरण मेहता यांच्यावरच शेकवले.

मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत काही प्रकल्पांबाबत चर्चा झाली होती. पण तेव्हा या प्रकरणाचा समावेश नव्हता. त्यातूनच आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय, असा शेरा लिहिल्याचे स्पष्टीकरण मेहता यांनी केल्याने विरोधकांना आयतेच कोलित मिळाले. मुख्यमंत्र्यांची संमती नसतानाही त्यांना माहिती दिली आहे, असे मेहता यांना भासविल्याने मुख्यमंत्र्यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली. मेहता यांनी आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला असला तरी आपण चौकशीस तयार आहोत हे वक्तव्य स्वत:हून केलेले नाही तर त्यांना तसे वक्तव्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. आपण चौकशीस तयार आहोत हे मेहता यांनी सांगताच मुख्यमंत्र्यांनी लगेचच या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे जाहीर केल्याने मेहता हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

मेहता यांच्या कार्यपद्धतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस हे फारसे खुश नसल्याची चर्चा मंत्रालयात आहे. संधी मिळताच मुख्यमंत्र्यांनी मेहता यांची चांगलीच कोंडी केली आहे. चौकशी कशा पद्धतीने होते यावरही सारे अवलंबून आहे. पण मेहता यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे. मंत्रिमंडळात खांदेपालटात मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खाते बदलले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.