आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली.

दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले “राजकारणात कधी काहीही होतं. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. तसेच ही जे अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे, ही फार काळ टीकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या देखील लक्षात आलं असेल. म्हणून मुख्यमंत्री यांनी मनातली भावना बोलून दाखवली.”

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी

“स्पष्टपणे समजतो काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका पूर्णपणे दुटप्पी आहे. आज खरा चेहरा उघड झाला आहे. पेट्रोल डिझेल हे GST मध्ये आणायला या पक्षांनी विरोध केला तर भाजपा आंदोलन करेल. एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत हे सांगायचं आणि ते भाव कमी करण्याकरीता  एक भाव देशात आणण्याकरिता पेट्रोल डिझेल हे GST मध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला. ज्यामुळे २० ते २५ रुपयांनी देखील पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकेल. तर त्याला विरोध करायचा. ही दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंच सायकल घेऊन का निघाले होता,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला आहे.

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपा-शिवसेना युती? 

“राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं पण आज ते मला दिसत नाही. स्पष्टपणे सांगतो, भाजपा सरकार बनवण्याच्या मानसिकतेत नाही. भाजपा महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा घेऊन आंदोनल करत आहे. भाजपा सरकारला उत्तरदायित्व शिकवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचा ऐवढाच अर्थ निघतो की, त्यांच्या लक्षात आलं की ते कशाप्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत. भ्रष्टाचार होत आहे. हे सगळं मुख्यमंत्र्यांना समजलं असेल. त्यामुळे आपण त्या शुभेच्छा समजूया”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.