‘भारतमाता की जय’वरून मुख्यमंत्र्यांनी ठणकावले, विधिमंडळात गदारोळ
‘भारतमाता की जय’ घोषणेवरूनचा वाद अजूनही सुरूच असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी गदारोळ झाला आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. ‘पण हा धार्मिक मुद्दा नसून अल्पसंख्याकांच्या मनात किंतु निर्माण करून विभाजनाचे बीज रोवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांवर करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मी पदावर असेन किंवा नसेन, पण ‘भारतमाता की जय’ म्हणतच राहीन, असे आक्रमक प्रत्युत्तर दिले. देशाबद्दल प्रेम नसणाऱ्यांनी देशात राहू नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावले.
‘भारतमाता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक येथे टीकास्त्र सोडले होते व हे सहन करणार नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य अल्पसंख्याकांबाबत शंका उत्पन्न करणारे असून त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. घटनात्मक पदावर असताना मुख्यमंत्र्यांनी तेढ निर्माण करणारी भूमिका घेऊन धार्मिक राजकारण करून लोकांची मने विचलीत करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका विखेपाटील यांनी केली. तर मुख्यमंत्री राज्यघटनेनुसार राज्य चालवीत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारभार चालवीत आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विरोधकांचे आरोपसत्र सुरू असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्यही आक्रमक झाले आणि अध्यक्षांपुढील जागेच्या दिशेने पुढे येऊन घोषणाबाजी करू लागले. काँग्रेस सदस्यही जागा सोडून अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करीत होते. विरोधकांनी राष्ट्रध्वज काढून सभागृहात फडकावला. तो उलटा फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी आणि सभागृहात उपस्थित असलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मांडला. तेव्हा सभागृहातील कामकाजाची चित्रफीत तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असा निर्णय तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दिला.
‘भारतमाता की जय’ न म्हणणाऱ्यांच्या मनात काळेबेरे
‘भारतमाता की जय’ न म्हणणाऱ्यांच्या मनात काळेबेरे असून हा धार्मिक मुद्दाच नाही. पण त्याला तसा रंग देणाऱ्यांना विभाजनाची बीजे रोवायची आहेत. माहीम येथील दग्र्यामध्ये एका कार्यक्रमासाठी ५०० हून अधिक मौलवी हजर होते. तेथे राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि भारतमातेचा जयघोषही झाला. अल्पसंख्याकही देशभक्त असून ते जयघोष करीतच आहेत. पण ज्यांचे देशावर प्रेम नाही, ते जाणीवपूर्वक वाद उकरून काढत आहेत.

..तर मुंडकी उडवली असती – बाबा रामदेव
देशाप्रति निष्ठा व श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भारत माता की जय म्हणणे आवश्यक आहे, मातृभूमीप्रति आदर व्यक्त करण्याचा तो मार्ग आहे, जर एखादा धर्म त्यापेक्षा वेगळे काही शिकवत असेल, तर ते देशहिताच्या विरोधात आहे, असे त्यांनी सद्भावना संमेलनात सांगितले.
ल्लहा जयघोष मातृभूमीचा आहे, धर्माचा नाही. रोहतक येथे सामाजिक समरसता मंचतर्फे संमेलन आयोजित केले होते.
ल्लएआयएमआयएमचे नेते असाउद्दीन ओवैसी यांनी अलीकडेच भारत माता की जय गळ्यावर सुरा ठेवला तरी म्हणणार नाही, असे वक्तव्य केले होते, त्याचा नामोल्लेख न करता रामदेव म्हणाले, ‘देशात कायदा आहे व राज्यघटना आहे. ती आम्ही पाळतो.

रोहतक :
देशातील कायद्याचा व राज्यघटनेचा सन्मान करणारा माणूस आहे अन्यथा भारत माता की जय या घोषणेस विरोध करणाऱ्या लाखो लोकांची मुंडकी उडवली असती, असे उद्गार योगगुरू रामदेव यांनी येथे काढले.

मी पदावर असेन किंवा नसेन, पण ‘भारतमाता की जय’ म्हणतच राहीन, देशाबद्दल प्रेम नसणाऱ्यांनी देशात राहू नये.
देवेंद्र फडणवीस</strong>