मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी संप स्थगित

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या योजनेची घोषणा लवकरच घोषणा केली जाणार आहे. तसे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्य़ातील पुणतांबे परिसरातील शेतकऱ्यांनी १ जून पासून पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आला. विरोधी पक्षांनी तर याच मागणीवरुन सरकारला घेरण्यासाठी अधिवेशनावर अघोषित बहिष्कार पुकारला होता. सत्ताधारी शिवसेनाही या मुद्यावर आक्रमक होती. ३१ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे घाईघाईने काही घोषणा न करता, कर्जमुक्तीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असला तरी विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा सुरु करुन  आक्रमक भूमिका घेतली आहे.

दुसऱ्या बाजूला कर्जमाफी व कृषीविषयक अन्य प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबे व परिसरातील चाळीस गावांतील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे प्रश्न समजावून घेतले. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मंगळवारी एक बैठक घेतली, त्याला पुणतांबे व अन्य चाळीस गावांमधील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे व विजय धनवटे उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, मोफत विजेयसह शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार शेतीच्या क्षेत्रात करीत असलेल्या कामाची माहिती दिली. राज्यात सुमारे एक कोटीहून अधिक शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारे आहेत. ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज विविध कारणांमुळे थकलेले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांसाठी एक योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. लवकरच त्याबाबतची योजना जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेने समाधान व्यक्त करुन, १ जून पासून पुकारण्यात आलेला शेतकऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.